पुणे : प्रभाग रचनेचे आदेश आले ; आता लागा कामाला | पुढारी

पुणे : प्रभाग रचनेचे आदेश आले ; आता लागा कामाला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी महापालिकेला मिळाले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या एकूण लोकसंख्यानुसार नगरसेवकांची संख्या 166 इतकी होणार असून त्यामध्ये तीन सदस्यांचे 54 तर चार सदस्यांचा एक असे एकूण 55 प्रभाग रचना करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार आज (दि.६) बुधवार पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.

राज्यातील मुंबई वगळता अन्य 18 महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे राजपत्र गत आठवड्यात राज्य शासनाने काढले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा करण्याचे आदेश या सर्व महापालिकानां दिले आहेत. या प्रभाग रचना नक्की कशा करायच्या यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही आयोगाने दिल्या असून त्यानुसारच या प्रभाग रचना करायच्या आहेत. दरम्यान या या प्रारूप प्रभाग रचनेसाठी काल मर्यादा देण्यात आली नसून कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर आयोगाला कळवयाचे आहे. त्यानंतर आयोग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे.

नक्की कशी होणार प्रभाग रचना

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेची 2011 ची एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 166 इतकी असणार आहेत. त्यात 3 सदस्यांचे 54 प्राभाग आणि शेवटचा एक प्रभाग 4 तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button