पुणे : चौकाचौकांत ‘मार्च एंड’ची धूम..! वाहतूक पोलिस, आरटीओ विभागाचा वाहनचालकांवर डोळा | पुढारी

पुणे : चौकाचौकांत ‘मार्च एंड’ची धूम..! वाहतूक पोलिस, आरटीओ विभागाचा वाहनचालकांवर डोळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यात चौकाचौकांत ग्रुपने थांबलेले वाहतूक पोलिस आणि आरटीओ निरीक्षक दिसले की, ‘मार्च एंड’ सुरू आहे, टार्गेट पूर्ण करायचे असे दिसतेय’ अशी चर्चा वाहनचालकांमध्ये सध्या जोरात सुरू आहे. या मार्च एंडच्या धास्तीमुळे बहुतांश नागरिक शहरात यायला धजावत नसून, खूपच निकडीचे काम लागल्यास ते रस्ते बदलून छोट्या गल्ल्यांमधून ये-जा करत आहेत.

पुण्यात ठिकठिकाणी ग्रुपने थांबलेले वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकार्‍यांना पाहून, पुणेकर वाहनचालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. ’ पुणेकरांना महिना पगार मुठभर आणि दंड झालाय हातभर’, अशी स्थिती सध्या शहरात आहे. ऑनलाइनचे दंड पुणेकरांच्या पगारापेक्षा जास्त झाले आहेत. त्यात पोलिसांनी पकडले की, सर्व दंड भरल्याशिवाय ते जाऊच देत नाहीत. इतर महिन्यांतही ही स्थिती आहे. मार्च महिना असल्यामुळे दंड वसुली सध्या खूपच कडक सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना घर चालवायचे की यांचा दंड भरायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Back to top button