शिवाजीनगर बसस्थानक दोन वर्षांत बांधणार; मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन | पुढारी

शिवाजीनगर बसस्थानक दोन वर्षांत बांधणार; मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर येथील एसटीच्या मूळ बसस्थानकाच्या ठिकाणी येत्या दोन वर्षांनी नवीन बसस्थानक बांधण्यात येईल, असे आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती. ते म्हणाले की, मेट्रो, एसटी, पीएमपी बससेवा येथून नागरिकांच्या सोयीची आहे. तेथे एकत्रित मोठे संकुल उभारण्यात येणार होते. मेट्रोचे काम झाले. बसस्थानक हलविलेल्या वाकडेवाडीच्या ठिकाणी स्थानिक नागरिक तीन वर्षांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत.

बसस्थानक स्थलांतरित केलेले ठिकाण दूध डेअरी विभागाचे असून, त्यांचे तेथे विकासकाम होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या एकात्मिक नियोजनानुसार इमारत कधी बांधणार आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भुसे म्हणाले की, मेट्रोसोबतच एसटी बसस्थानकाचे काम व्हायला हवे होते. फेब्रुवारीत मुख्य सचिवांनी बैठक घेतली. दोन वर्षांत शिवाजीनगरला बसस्थानक बांधण्याचे ठरले आहे.

Back to top button