खोर : भीमा पाटस कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता | पुढारी

खोर : भीमा पाटस कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

खोर; पुढारी वृत्तसेवा : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता सोमवारी (दि. 13) झाली. तीन महिन्यांच्या कालावधीत कारखान्याने 3 लाख 12 हजार 215 टन उसाचे गाळप करत 2 लाख 82 हजार 200 क्विंटल साखर पोती उत्पादित केली. सरासरी साखर उतारा 11.25 टक्के मिळाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली.

निराणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मृगेश निराणी, संगमेश निराणी, विशाल निराणी, विजय निराणी यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा पाटस कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. गेली चार वर्षांपासून हा कारखाना बंद होता. निराणी ग्रुपने हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला. कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल हेदेखील सातत्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाचे पाठीशी उभे राहिले.

गेली चार वर्षे बंद असलेला भीमा कारखाना पुन्हा सुरू झाल्याने सभासद शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, ट्रॅक्टरचालक आणि कारखान्यावर अवलंबून असणारे सर्वच घटकांत समाधानाचे वातावरण निमार्ण झाले आहे. वेळच्या वेळी कामगारांचा पगार, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पेमेंट, वाहतूकदारांची बिले अदा करून शेतकरी व कामगारांचा विश्वास कारखान्याने पुन्हा मिळविला.

जास्तीत जास्त भाव देणार
पुढील हंगाम 1 ऑक्टोबरदरम्यान सुरू होणार आहे. इतर कारखान्यांपेक्षा उसाला जास्तीस जास्त भाव देऊन दिवसाला 15 हजार टन गाळप करण्याचा आमचा मानस आहे. डिस्टिलरी प्रकल्पातदेखील दिवसाला 6 लाख लिटर घेण्याचे उद्दिष्ट असणार आहे, असे कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी सांगितले.

गेली चार वर्षांपासून बंद असलेला कारखाना सुरू करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे थोडी घाई करावी लागली. पुढील हंगामात यापेक्षा चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचा आमचा मानस आहे. उसाला उच्चांकी दर देऊन जास्तीत जास्त गाळप करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
रविकांत पाटील, कार्यकारी संचालक, भीमा पाटस कारखाना.

Back to top button