पिंपरी : देवगड हापूस खातोय भाव; 1200 रुपये डझनाने विक्री | पुढारी

पिंपरी : देवगड हापूस खातोय भाव; 1200 रुपये डझनाने विक्री

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड येथील बाजारपेठेत देवगड आणि रत्नागिरी हापूस दाखल झाला आहे. वाशी आणि पुणे येथील मार्केटयार्डमधून येथे माल विक्रीसाठी आला आहे. देवगड हापूस 1200 रुपये डझन या दराने तर, रत्नागिरी 1100 ते 1200 रुपये डझन या दराने विकला जात आहे. उन्हाळ्यामध्ये आंबा फळाचे सर्वांनाच आकर्षण असते. पुणे येथील मार्केटयार्डमध्ये दरवर्षी जानेवारीच्या सुमारास हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी येते. पिंपरी-चिंचवड येथील बाजारपेठेत मात्र, हापूस उशीरा दाखल होतो.

पिंपरी-चिंचवड येथील बाजारपेठेत साधारण फेब्रुवारी महिन्यापासून हापूस विक्रीसाठी यापूर्वी दाखल होत असे; मात्र यंदा रत्नागिरी आणि देवगड हापूस विक्रीसाठी दाखल होण्यासाठी मार्च महिना उजाडला आहे. पिंपरीतील बाजारपेठेत केरळ हापूस यापूर्वीच विक्रीसाठी दाखल झाला आहे. येथे अद्याप रत्नागिरी आणि देवगड हापुसची विशेष आवक झाली नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने आंबा विक्रेत्यांनी देखील आंबा मागविताना ऑर्डरनुसारच मागविण्यावर भर दिला आहे.

अद्याप मागणी कमी
देवगड आणि रत्नागिरी हापूस चिंचवड येथील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला असला तरी अद्याप त्याला मागणी कमी आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर हापुसच्या मागणीत वाढ होईल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. यंदा सीझन उशीरा सुरु झाल्याने बाजारपेठेत हापुसही उशीरा दाखल झाला आहे. सध्या आवक कमी आहे. गुढीपाडव्यानंतर मागणी आणि आवक वाढल्यानंतर हापुसचे दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या हापूस एक व दोन डझनच्या पेटीत उपलब्ध आहे.

Back to top button