पुणे : पामतेल नको; सोयाबीन-सूर्यफूल तेल द्या! | पुढारी

पुणे : पामतेल नको; सोयाबीन-सूर्यफूल तेल द्या!

शंकर कवडे

पुणे : ”मी पूर्वी इतर तेलांपेक्षा स्वस्त असे पामतेल वापरत होते, पण पाम तेलाने हृदयविकाराला आमंत्रण मिळते, असे कळाल्याने त्यापेक्षा थोडे महाग सोयाबीन तेल वापरायला लागले. आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसलेले, तसेच स्वयंपाकघरातून हद्दपार झालेले तेल सरकार पुन्हा आनंद शिधामार्फत घरोघरी वाटणार आहे. त्यामुळे, शासनाला गरिबांच्या आरोग्याची काळजी नाही का,‘ असा सवाल गृहिणी सूर्या वाघरी यांनी उपस्थित केला.

दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ व साखर, तसेच एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी शहरातील गोर-गरीब, कष्टकरीवर्गाशी संवाद साधला. या वेळी पामतेलाऐवजी सोयाबीन अथवा सूर्यफूल तेलाचा आनंद शिधेत समावेश करावा, अशी मागणी गृहिणींकडून करण्यात आली.

..असे होते पाम अन् पामतेल तयार
समुद्रानजीकच्या भागात पामची लागवड केली जाते. पामच्या झाडासाठी खारे वारे, तसेच दमट हवा पोषक असते. पामचे झाड हे खजुरासारखे असते. तसेच, त्याचे फळ हे खजुरासारखे असतात. त्याची तोड झाल्यानंतर 48 तासांच्या आत त्याचे तेल काढले जाते. सध्या देशात तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये लागवड करण्यात येत असून, उत्पादन सुरू आहे.

इंडोनेशिया, मलेशियातून तेल भारतात
पामतेल उत्पादनात इंडोनेशिया जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मलेशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही आफि—कन देशांमध्येही याचे उत्पादन केले जाते. खाद्यतेलाच्या बाबतीत, भारतातील दोन तृतीयांश आयात केवळ पामतेलाची आहे. भारतात दर वर्षी सुमारे 60 ते 70 लाख टन पामतेल आयात होते. एकूण आयातीपैकी 70 टक्के पामतेल इंडोनेशियाकडून, तर उर्वरित 30 टक्के मलेशियाकडून खरेदी करण्यात येते. दर्जाच्या बाबतीत इंडोनेशियाच्या तुलनेत मलेशियाचे तेल चांगले असते.

गोडेतेल म्हणून होते विक्री
खाद्यतेलांमध्ये पामतेल हे सर्वांत स्वस्त असते. त्यामुळे, आजही शहरातील बहुतांश झोपडपट्ट्यांमधील किराणा दुकानात पामतेलाची विक्री होते. याठिकाणी पामतेल हे गोडेतेल म्हणून विक्री करण्यात येते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बहुतांश गृहिणी दररोज 50 ग्रॅमतेल पिशवी अथवा वाटीमध्ये घेऊन जातात.

पामतेल लोकप्रिय असण्याची कारणे
अन्य खाद्यतेलांच्या तुलनेत अत्यल्प दरामध्ये उपलब्ध
कन्फेक्शनरी प्रोडक्ट्स
म्हणजेच बेकरी प्रॉडक्ट,
कॉफी क्रीमर यामध्ये वापर
कॉस्मेटिक्स, साबण यांच्यामध्ये बेस म्हणून वापर
हलक्या दर्जाच्या कुकीज, केक, प्रोटिन बार, लोणचे, मेयोनीज पदार्थ बनवताना वापर

  • शहरातील गरीब, कष्टकरीवर्गाला नकोय पामतेल
  • गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती दिनी मिळणार आनंद शिधा
  • शंभर रुपयांत मिळणाऱ्या शिधेत मिळणार एक किलो पामतेल

खाद्यतेलांचे दर व शहरातील खप              खाद्यतेल दर (प्रतिकिलो) खप
(प्रतिदिन) पामतेल 90                                    50 ते 60 टन
सोयाबीन तेल 110 ते 115                             120 ते 150 टन
सूर्यफूल रिफाइंड तेल 120 ते 125                   100 ते 120 टन

पामतेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात. ज्याच्या सेवनाने रक्तातील एलडीएल, ट्रायग्लासराईड्स वाढतात. ज्यामुळे हृदयामध्ये ब्लॉक निर्माण होतात. विकारांना आमंत्रण मिळते. पाममध्ये वारंवार तळून बनवलेल्या पदार्थात व याच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. एखाद्या जखमेतून होणारा रक्तस्राव अथवा अपघातानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर होणार्‍या रक्तस्त्रावांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनण्यासाठी गरजेच्या असणार्‍या प्रक्रियेत पामतेलाच्या सेवनाने गुंतागुंत निर्माण होते.

                      – जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

Back to top button