पुणे : सर्वाधिक अपघात दुचाकींचे; संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान दुर्घटना जास्त | पुढारी

पुणे : सर्वाधिक अपघात दुचाकींचे; संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान दुर्घटना जास्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात आणि परिसरात होणार्‍या अपघातांमध्ये दुचाकी गाड्यांच्या अपघातांचे प्रमाण जास्त असून, तब्बल 88 टक्के अपघात पादचारी आणि दुचाकीस्वारांचे असल्याचे दिसत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सायंकाळी 6 ते 9 यादरम्यानच्या वेळेत
अपघात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्हातील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना व प्रबोधनपर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आरटीओकडून अपघातांबाबत शास्त्रशुध्द अभ्यास करण्यात आला.

यात मागील वर्षीच्या आणि यंदाच्या अपघातांचा अभ्यास करण्यात आला. तसेच अपघातांच्या वेळेबाबत त्यातील वाहने आणि अन्य कारणे याबाबत अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात सर्व अपघात सायंकाळी 6 ते 9 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच पहाटे 2 ते 5 या वेळी अपघाताची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. तसेच, यामध्ये इतर वाहनांच्या तुलनेत मोटारसायकल आणि पादचारी अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या तब्बल 90 टक्के आढळून आले आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना हेल्मेटसक्ती…
आरटीओकडून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट परिधान करूनच कार्यालयाच्या आवारात प्रवेश करावा अन्यथा कारवाई करण्याबाबत पत्रक काढले आहे. तसेच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महाविद्यालय, बँक इत्यादी विभागांना कर्मचार्‍यांनी हेल्मेट वापराबाबत पत्र दिले आहे.

या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अपघात…
अपघाताचे तालुकानिहाय विश्लेषण केले असता, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर तालुका, जुन्नर तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आरटीओने तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांची रस्ता सुरक्षा प्रबोधन करणे व त्यादृष्टीने वाहन तपासणी करणे यासाठी नियुक्ती केली आहे.

Back to top button