पुणे : पीयूसी नसल्याने 446 वाहनांवर आरटीओची कारवाई | पुढारी

पुणे : पीयूसी नसल्याने 446 वाहनांवर आरटीओची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात तब्बल 35 लाख वाहनचालकांकडून पीयूसी काढण्यात आले नसल्याचे वृत्त मागील महिन्यात दि. 21 रोजी दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी पीयूसी कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे 446 वाहनचालकांवर पीयूसी नसल्यामुळे दंडात्मक कारवाई केली आहे. शहरात वाहनांची संख्या 44 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी फक्त 9 लाखच वाहनचालकांनी पीयूसी काढले आहे.

वाहनांच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात माहिती देणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर परिवहन विभागातील यंत्रणेमध्ये मोठी हालचाल झाली आणि तातडीने पीयूसीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सर्व वायुवेग पथकांना दिले आहेत. त्यामुळे पीयूसीची कारवाई आता शहरात अधिक तीव्र होणार आहे.

पीयूसी नसल्यास होणार इतका दंड…

दुचाकी : 2 हजार रुपये
तीनचाकी : 2 हजार रुपये
चारचाकी : 4 हजार रुपये

पीयूसीचे दर
चारचाकी पेट्रोल : 125 रु.
चारचाकी डिझेल : 150 रु.
दुचाकी : 50 रु.
पुण्यातील पीयूसी केंद्रे : 288

मोटार वाहन कायद्यातील कलम 115/190 आणि 116/190 नुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे शहरासह पुणे विभागात ही धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तत्काळ वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button