मोरगाव एसटी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांची नाराजी | पुढारी

मोरगाव एसटी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांची नाराजी

मोरगाव(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र मोरगाव येथील एसटी बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बसस्थानकातील अस्वच्छ स्वच्छतागृह, आवारात पडलेले खड्डे, उखडलेली खडी, वाहतूक नियंत्रण कक्ष नाही, रात्रीची दिवाबत्ती, कचर्‍याचे ढीग, गलिच्छ बाकडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आदी समस्या असल्यामुळे येथील प्रवासी व गणेशभक्तांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्यांकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य सचिन गारडे, अक्षय तावरे, सामाजिक कार्यकर्ते समीर गायकवाड यांनी नुकतीच बसस्थानकाची पाहणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मोरगाव तीर्थक्षेत्रामुळे या ठिकाणी पर्यटक, गणेशभक्तांची नियमितपणे मोठी वर्दळ असते. तसेच जेजुरीचा खंडोबा, करंजे येथील सोमेश्वर मंदिर, लोणी भापकर येथील दत्तानंद सरस्वती यांची समाधी, ऐतिहासिक वास्तू भैरवनाथ मंदिर, मोढवे येथील मरीमाता मंदिर, सुपा येथील मन्सूरबाबा दर्गा यामुळे देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते.

यापैकी मोरगाव हे केंद्रस्थानी आहे. प्रवासी व भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रयत्नाने एसटी बसस्थानक बांधले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या बसस्थानकात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामध्ये अस्वच्छता असून दुर्गंधी सुटलेली आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष नाही. रात्री दिवाबत्तीची व्यवस्था नाही. आवारात कचर्‍याचे ढीग साचलेले आहेत.

आवारातील खडी उखडली गेली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. प्रवाशांना बसण्यासाठीचे बाकडे गलिच्छ झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. या ठिकाणी नियंत्रण कक्ष नसल्यामुळे शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना पास मिळवण्यासाठी जेजुरी किंवा बारामती येथे जावे लागत आहे. अनेकदा नियंत्रण कक्ष नसल्याने एसटी बस स्थानकाबाहेरूनच निघून जात आहेत. त्यामुळे बसस्थानकात थांबलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ होते. याशिवाय सकाळी मोरगाव येथून एसटी बस उपलब्ध नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना जीव धोक्यात घालून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

येत्या 8 दिवसांत मोरगाव बसस्थानकाची स्वच्छता करण्यात येईल. तसेच या ठिकाणी वेळापत्रक लावण्यात येईल. नियंत्रण कक्षासाठी तांत्रिक अडचणी आहेत.

                                – राहुल कुंभार, आगारप्रमुख, बारामती

Back to top button