आरोग्य विभागावर रिक्त पदांची अमावास्या; पुरंदर तालुक्याची आरोग्यसेवा कोलमडली | पुढारी

आरोग्य विभागावर रिक्त पदांची अमावास्या; पुरंदर तालुक्याची आरोग्यसेवा कोलमडली

निखिल जगताप

बेलसर(पुरंदर) : कोरोना महामारीमध्ये पुरंदर आरोग्य विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे; परंतु सद्य:स्थितीला पुरंदर पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची जवळपास 41 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यामध्ये असलेल्या जिल्हास्तरावरील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व 37 उपकेंद्रांमध्ये मिळून असलेल्या रिक्त पदांमुळे आरोग्य विभागावर रिक्त पदांची अमावास्या ओढवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुरंदर तालुक्यातील जिल्हास्तरावरील बेलसर, माळशिरस, परिंचे, निरा आणि वाल्हा या पाच गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यासोबतच या 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत 37 उपकेंद्रे आहेत. तसेच राज्यस्तरावरील जेजुरी आणि सासवड या ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत; परंतु रिक्त जागांमुळे सर्वच आरोग्य केंद्रांचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे.

तालुक्यामध्ये सद्य:स्थितीत साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मात्र, रिक्त पदांमुळे सेवा देण्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांवर अधिकचा ताण येत आहे. शासनाकडून नवनवीन योजना किंवा हाती घेत असलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमांमुळे कर्मचार्‍यांवर अधिकच ताण निर्माण होत आहे. प्रशासनाने त्वरित याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

रिक्त असलेली 19 तांत्रिक पदे – वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी/आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक पुरुष, आरोग्य सहायक स्त्री, औषध निर्माता, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका.

रिक्त असलेली अतांत्रिक 22 पदे – कनिष्ठ सहायक, परिचर आणि वाहनचालक.

रिक्त पदे असलेली गावे – परिंचे, वाल्हे; आरोग्य विभाग, पंचायत समिती, पुरंदर; माळशिरस, बेलसर, काळदरी, नायगाव, साकुर्डे, मावडी क. प., भिवरी, राजुरी आणि निरा.

आरोग्य विभाग, पंचायत समिती पुरंदरअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे
पदे            जिल्हास्तर        राज्यस्तर    एकूण
तांत्रिक          15                   4            19
अतांत्रिक       22                   0            22
एकूण           37                   4            41

1 एप्रिल 2023 पर्यंत आरोग्य विभागाच्या रिक्त पदांच्या जागांच्या भरतीबाबत जाहिरात काढून भरती केली जाईल. पुढील काळामध्ये कोणतीच जागा रिक्त राहणार नाही. नागरिकांना योग्य त्या सोयीसुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.

                     डॉ. भगवान पवार, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, पुणे

रिक्त पदांच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदने वेळोवेळी देत आहोत. जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व रिक्त पदे भरण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. समानीकरण धोरणामुळे जागा रिक्त आहेत; परंतु सर्वच आरोग्य केंद्रांवर सेवा देण्यासाठी आम्ही एकनिष्ठेने काम करीत आहोत.

                   डॉ. विक्रम काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पुरंदर

Back to top button