पुणे : अवकाळीने 20 हजार हेक्टरवरील पिके बाधित | पुढारी

पुणे : अवकाळीने 20 हजार हेक्टरवरील पिके बाधित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागील तीन-चार दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍यांमुळे रब्बी हंगामातील पिके आणि फळबागा, भाजीपाल्याच्या आर्थिक नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढले आहे. बुधवार अखेर (दि. 8) अवकाळीमुळे पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र 19 हजार 904 हेक्टरवर पोहोचले असून, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक तडाखा बसल्याचे आयुक्तालयाच्या अहवालात म्हटले आहे.

पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुणे विभाग : पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यात 39 हेक्टरवरील गहू, कांदा, द्राक्ष, आंबा पिकाचे तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव तालुक्यातील 4 हजार 177 हेक्टरवरील मका, गहू, कांदा, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील 44 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सात तालुक्यांना बसला आहे. इंदापूर येथे वीज पडून 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 44.3 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, सविस्तर पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 18.20 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. हवेलीमध्ये 0.80 मिमी, मुळशीमध्ये 1.17 मिमी, मावळमध्ये 8.73 मिमी, जुन्नरमध्ये 6 मिमी, खेडमध्ये 4 मिमी आणि शिरूरमध्ये 0.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

  • 13 जिल्ह्यांतील रब्बी पिकांना मोठा फटका
  • पिकांच्या नुकसानक्षेत्राचा आकडा आणखी वाढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकार्‍यांशी बोलून तत्काळ आढावा घेऊन परिस्थितीची माहिती मागवली आहे. तसेच तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवालात तीन तालुक्यांतील फळपिकांना फटका बसला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदारांसोबत बैठक घेऊन पंचनाम्याच्या कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत.
                                 – धनंजय जाधव (उपजिल्हाधिकारी, गृहशाखा)

Back to top button