पुणे : बिल्डरसाठी चक्क बीआरटी बसस्थानक झोपडपट्टीत | पुढारी

पुणे : बिल्डरसाठी चक्क बीआरटी बसस्थानक झोपडपट्टीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांचे हित जोपासण्याऐवजी पीएमपीएमएल प्रशासनाने बिल्डरचे हित जोपासल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम प्रकल्पासाठी विश्रांतवाडी येथील बीआरटीचे बसस्थानक चक्क झोपडपट्टीतच स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना झोपडपट्टीतील घाणीचा त्रास सहन करावा लागत असून, पीएमपी वाहकांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. पीएमपीने महापालिका ते विश्रांतवाडी या रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी बीआरटीची सेवा सुरू केली.

त्यासाठी विश्रांतवाडी-विमानतळ सर्व्हिस रस्त्यावर बीआरटीचे बसस्थानक करण्यात आले होते. मात्र, या बसस्थानकाशेजारी एका बांधकाम प्रकल्पाचे काम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच साधारण दीड ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी काही अंतरावर हे स्थानक हलविण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार साधारण तीन वर्षांपूर्वी हे बसस्थानक रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टीत हलविण्यात आले. या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस झोपड्या आहेत.

त्यामुळे येथील झोपडपट्टीतील नागरिक, लहान मुले यांचा वावर या स्थानकात असतो. त्यामुळे येथील बसस्थानकाच्या परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना या ठिकाणी बसावे लागते. यामधील अनेक थांबे ज्या ठिकाणी बस थांबत नाहीत अशा ठिकाणी बसविले आहेत. यामधील धक्कादायक प्रकार म्हणजे हे स्थानक तात्पुरत्या कालावधीसाठी स्थलांतरित करण्यास परवानगी दिली होती. आता आधीच्या जागेवरील बांधकाम प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. असे असताना बसस्थानक मात्र पुन्हा जागेवर आलेले नाही. यासंबंधीची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची की संबंधित बिल्डरची, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, पीएमपीकडून याकडे सोईस्कर काणाडोळा करण्यात येत आहे.

एसआरएने त्या वेळी आम्हाला दिलेल्या पत्रानुसार तत्कालीन सीएमडी यांची मान्यता घेऊन आम्ही हे बसथांबे हलविले आहेत. यातील फक्त तीन-चार शेड सर्व्हिस रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आणले आहेत. वीस फुटांचे फक्त अंतर असून, नागरिकांना पायपीट करावी लागत नाही.

                   – डी. एम. तुळपुळे, मुख्य अभियंता (सिव्हिल), पीएमपीएमएल

Back to top button