महाळुंगे पडवळ : आर्थिक गणित बिघडले; कोबी, फ्लॉवर, वांगी, टॉमेटोसह पालेभाज्या मातीमोल | पुढारी

महाळुंगे पडवळ : आर्थिक गणित बिघडले; कोबी, फ्लॉवर, वांगी, टॉमेटोसह पालेभाज्या मातीमोल

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : कोबी, फ्लॉवर, वांगी, टॉमेटोसह पालेभाज्यांचे बाजारभाव कोसळले आहेत. केलेल्या खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. महाळुंगे पडवळ येथील आठवडे बाजारात पाच रुपयांना दोन कोथिंबिरीच्या जुड्या विकल्या जात होत्या. भाव नसल्याने काही शेतकर्‍यांनी वांगी पीक जमीनदोस्त केले, तर कोथिंबिरीच्या शेतात शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत.

हुतात्मा बाबू गेनू जलसागराच्या डाव्या कालव्यातून शाश्वत पाणी उपलब्ध झाल्याने कळंब, चांडोली बुद्रक, लौकी, साकोरे, नांदूर, चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ आदी 40 गावांत शेतकरी कोबी, फ्लॉवर, वांगी आदी नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे पिकांवर करपा, अळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, शेतकर्‍यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. वाहतूक, मजुरीसह उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.

उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकर्‍यांनी पिकांची काढणी थांबविली आहे. साकोरे येथील शेतकरी दशरथ चिखले यांनी सुमारे एक एकर कोथिंबीर फक्त चार हजार रुपयांना विकली. कोथिंबीर उत्पादित करण्यासाठी त्यांना सुमारे वीस हजार रुपये खर्च आला. महाळुंगे पडवळ येथील शेतकरी गुलाब आवटे यांचा 30 गुंठे तोडणीला आलेला टोमॅटोचा फड बाजारभावाअभावी सोडून दिला. यामुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आवटे कुटुंबीयांनी दिली. लौकी येथील शेतकरी संतोष थोरात यांनी वांगे लागवडीसाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च केले होते. त्यानंतर बाजारभाव कोसळले. बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित
बिघडले आहे.

Back to top button