उंडवडी : फड पेटवून होतेय उसाची तोड; शेतकरी चिंताग्रस्त | पुढारी

उंडवडी : फड पेटवून होतेय उसाची तोड; शेतकरी चिंताग्रस्त

उंडवडी(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : ऊस जाळल्याशिवाय तोड होत नसल्याने पारवडी येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशा पध्दतीने तोड झाल्यास उसाचे वजन कमी भरते. संबंधितांनी यात लक्ष घालून ऊस न जाळता तोडावा, अशी मागणी शेतकरी पांडुरंग शिपकले यांनी केली आहे. दरम्यान, बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने पारवडीतील ऊस तोडणीस प्राधान्य द्यावे, अशी मागणी या भागातील ऊस उत्पादकांनी केली आहे.

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु, पारवडी गावातील उसाची अद्याप तोड झालेली नाही. गावापासून 3 किलोमीटर अंतरावर बारामती अ‍ॅग्रो साखर कारखाना आहे. परंतु, गावातील ऊस अद्याप संपलेला नाही. कारखान्याचे अधिकारी यांना शेतकरी यांनी संपर्क साधल्यास ते टोळी मालकाकडे पाठवतात.

टोळी मालकाला संपर्क केला तर ते मुकादमला संपर्क करायला लावतात. टोळीचा मुकादम एकरला 4 हजार ते 5 हजार तोडणीचे सांगत आहेत. ते देऊनही ऊस जाळावाच लागेल असे ते सांगत आहेत. ट्रॅक्टरचालक एका खेपेला 200 ते 300 रुपये भत्ता म्हणून घेत आहेत. कारखाना बंद होण्याच्या भीतीने शेतकरीदेखील नाईलाजास्तव त्यास संमती देत आहेत. यामुळे शेतकर्यांना मोठा आथिर्क भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऊसतोडणी यंत्रणेकडून होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button