पुणे: कसब्यातील मतदारांनी धनशक्ती लाथाडली, संजय राऊत यांची भाजपवर टीका | पुढारी

पुणे: कसब्यातील मतदारांनी धनशक्ती लाथाडली, संजय राऊत यांची भाजपवर टीका

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘कसब्यात मतदारांच्या घरात पैशांची पाकिटे फेकून, त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कॅबिनेट कसब्यात मंत्रिमंडळ बैठका घेत होते. मात्र, पुणेकर मतदारांनी आमिषाला बळी न पडता धनशक्ती लाथाडली,’ अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि.४) पुण्यात केली.

पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी कसबा पेठ व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. ‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है,’ ‘कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. महाविकास आघाडीने एकजुटीने काम केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशेपेक्षा जास्त व लोकसभा निवडणुकीत किमान चाळीस जागा मिळतील,’ असे ते म्हणाले.

‘महाविकास आघाडी एकत्र लढल्यास कसब्याप्रमाणे निकाल लागतो आणि एखादा बंडखोर किंवा घटकपक्ष बाजूला गेल्यास चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला धडा आहे,’ असे त्यांनी नमूद केले. ‘चिंचवडचा विजय भाजपचा नसून, जगताप पॅटर्नचा आहे. तेथील बंडखोर राहुल कलाटे यांना माघार घेण्यात यश मिळाले असते, तर नक्कीच वेगळा निकाल लागला असता.’ असे म्हणत त्यांनी मतदारांचे अभिनंदन केले.

दरम्यान, विधिमंडळावर वादग्रस्त टीका केल्याबद्दल राऊत यांना अटक करण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांकडून केली जात आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘अटक होणार असेल, तर होऊन जाऊ द्या, पण संबंधित चाळीस आमदारांनी स्वतःचे अंतरंग तपासावे. विधिमंडळाचा मी पूर्णपणे आदर करतो. माझे विधान विशिष्ट फुटीर गटाबद्दल आहे. यासंदर्भातील नोटीस वाचून उत्तर देईन,’ असेही त्यांनी सांगितले.

Back to top button