पुणे : आता यशवंत कारखान्याच्या निवडणुकीचा विचार | पुढारी

पुणे : आता यशवंत कारखान्याच्या निवडणुकीचा विचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यशवंत सहकारी साखर कारखाना (थेऊर, ता. हवेली) सुरू करण्यावर चर्चा करणे आणि कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा पुढील शनिवारी (दि. 11) बोलविण्यात आली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मान्यतेने ही सभा होत आहे. अनेक वर्षे हा कारखाना सुरू करण्याबाबतचा रेंगाळलेला प्रश्न या विशेष सभेच्या निमित्ताने तरी मार्गी लागणार का? याकडे हवेली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि पुणे प्रादेशिक साखर उपसंचालक संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली थेऊर येथे कारखानास्थळावर 11 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदे यांनी सूचनेद्वारे केले आहे. यशवंत कारखान्यातील आर्थिक अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे कारखाना 2011-12 या वर्षापासून बंद आहे.

कारखान्यावर प्रथम प्रशासकाची नियुक्ती आणि त्यानंतर कारखान्याचा कारभार गुंडाळून अवसायक नेमण्यात आला. यशवंत कारखाना बंद राहिल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान हे सर्व केवळ अवसायकाच्या निष्क्रियतेमुळे झाल्याचा ठपका महाविकास आघाडी सरकारने ठेवला आणि तत्कालीन पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखाना अवसायनात काढण्याचा दिलेला 16 नोव्हेंबर 2017 रोजीचा आदेश तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रद्द केला.

त्यानंतर कारखान्यावर प्रशासक नेमून कामकाज सुरू झालेले आहे. सन 2011 पासून कारखाना बंद स्थितीत असल्याने तो चालू करण्याबाबत चर्चा करणे, कारखान्याची निवडणूक घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, निवडणूक प्रक्रियेसाठी सभासद यादी अद्ययावत करणे, मयत वारस नोंदी, भाग हस्तांतरण इत्यादींवर चर्चा करून निर्णय घेणे, कारखान्याचा आसवणी प्रकल्प, पेट्रोल पंप, शाळा इत्यादींच्या कामकाजाबाबत चर्चा करणे तसेच गोडावून व इतर अनुषंगिक मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सभेत उहापोह होणार आहे.

कारखान्यावर सद्य:स्थितीत चालू असलेले बँक दावे तसेच अन्य न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेणे, संस्थेची एकूण मालमत्ता व अतिक्रमणे इत्यादींबाबत माहिती घेऊन चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. दरम्यान, यशवंत कारखान्यावर प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह अन्य बँकांचीही कर्जे आहेत. कारखान्याचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यामुळे कर्जांसह कारखान्याचा आर्थिक लेखाजोखाही त्यानिमित्ताने समोर येणार आहे.

त्यामुळे यशवंत कारखान्यावर कोणकोणत्या बँकांची आणि किती कर्जरक्कम आहे, याची माहिती विशेष सभेच्या निमित्ताने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांकडून मागितली जाणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीनेही या सभेला आता विशेष महत्त्व आले आहे. महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात तरी यशवंत सुरू होणार का? त्यासाठी भारतीय जनता पक्ष या कारखान्यासाठी आर्थिक पाठबळ देणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

थेऊर येथील बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा 11 मार्च रोजी कारखानास्थळावर होत असून, त्यामध्ये सभासदांच्या उपस्थितीत विविध विषयांवर निर्णय घेतले जातील. तसेच या साखर कारखान्याचे लेखापरीक्षण 31 मार्च 2022 अखेर पूर्ण करण्यात आले आहे.

                                                                      – संजय गोंदे,
               प्रशासकीय समिती अध्यक्ष व पुणे प्रादेशिक साखर उपसंचालक.

Back to top button