मंचर : पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार मागे | पुढारी

मंचर : पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार मागे

मंचर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षक महासंघ नियामक मंडळासमवेत सविस्तर चर्चा होऊन कनिष्ठ शिक्षक महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे महासंघाने 12 वीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले, ही माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे पुणे विभागीय सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे यांनी गुरुवारी (दि. 2) दिली.

शिक्षकांच्या मान्य झालेल्या मागण्या पुढीलप्रमाणे : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 10-20-30 वर्षांनंतरची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येईल व तसा प्रस्ताव वित्त विभागाकडे आजच सादर करण्यात आला. 214 व्यपगतपदांना उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली असून, त्याबाबतचा शासन आदेश 15 दिवसांत निर्गमित करण्यात येईल, तर उर्वरित कार्यरत असलेल्या वाढीव पदावरील शिक्षकांना अधिवेशन काळातच उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक आयोजित करून मान्यता देण्यात येईल.

आयटी विषय नियुक्ती मान्यताप्राप्त शिक्षकांना अनुदानितपद मान्यता व वेतनश्रेणी लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे पुढील 15 दिवसांत प्रस्ताव सादर केला जाईल. अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याबाबत महासंघाने आवश्यक त्या सुधारणा शिक्षण विभागाकडे सादर कराव्यात. शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येचे निकष शासनाने पूर्वी मान्य केल्याप्रमाणेच असतील.

1 डिसेंबर 2022 रोजी प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून मान्यता देण्यात येईल. ऊउझड/ छझड चे हिशेब शिक्षकांना मार्च 2023 अखेर देण्यात येतील. इतर मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर बैठक आयोजित करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, स्वीय सहायक डॉ. मंगेश शिंदे, मुख्य सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव काझी, उपसचिव समीर सावंत, उपसचिव तुषार महाजन, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर, सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, प्रा. अविनाश बोर्डे, प्रा. अशोक गव्हाणकर, प्रा. सुनील पूर्णपात्रे आदी उपस्थित होते.

Back to top button