कसबा पेठ मतदारसंघात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त | पुढारी

कसबा पेठ मतदारसंघात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे.

कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर व कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरेगाव पार्कमधील गोदामात मतमोजणी होणार असून, तेथील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (दि. 1) पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

Back to top button