पुणे : आरटीई प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन भरा अर्ज | पुढारी

पुणे : आरटीई प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन भरा अर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून (दि.1) सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी 17 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.

प्रवेशप्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू होणार होती. मात्र, प्रवेशासाठी मुलांचे आधारकार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविले होते. याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर, आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळाला आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना 1 मार्च ते 17 मार्च या कालावधीत अर्ज करता येतील. बुधवारी दुपारी तीन वाजल्यानंतर पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळा असून, त्यामध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांनी https:// student. maharashtra. gov. in  या लिंकचा वापर करावा. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्‍या कागदपत्रांची माहिती आणि इतर सविस्तर माहिती आरटीईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पुणे जिल्ह्यात 15 हजार 612 जागा
पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी 935 शाळा उपलब्ध आहेत. या शाळांमध्ये प्रवेशासाठी 15 हजार 612 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्ह्यात दरवर्षी 15 हजारांच्या आसपास जागा असतात. या जागांच्या चौपट अर्ज पुणे जिल्ह्यातील पालकांकडून दाखल करण्यात येतात. त्यामुळे यंदा जागांची संख्या अधिक असली, तरी प्रवेशासाठी चुरस कायम
राहणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी मदत केंद्र
दुर्बल आणि वंचित घटकांमधील पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरताना मदत व्हावी, यासाठी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन आणि मदतकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पालकांनी सानेगुरुजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पर्वती पायथा या ठिकाणी आरटीई पालक केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहे.

Back to top button