भवानीनगर : छत्रपती कारखान्याचे आठ लाख टन उसाचे गाळप | पुढारी

भवानीनगर : छत्रपती कारखान्याचे आठ लाख टन उसाचे गाळप

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये कारखान्याने आठ लाख वीस हजार एकशे ऐंशी टन उसाचे गाळप केले आहे श्री छत्रपती कारखान्याने यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये 26 मार्चपर्यंत गाळप हंगामाचे 128 दिवस पूर्ण केले आहेत.

कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता 20 मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे. श्री छत्रपती कारखान्याने 26 फेब्रुवारीपर्यंत पाच लाख 97 हजार 655 टन सभासदांच्या उसाचे व दोन लाख बावीस हजार पाचशे पंचवीस टन गेट केन असे मिळून आठ लाख वीस हजार 180 टन उसाचे गाळप करून आठ लाख 53 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याला सरासरी साखर उतारा 10.58 टक्के मिळाला आहे.

कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून दोन कोटी 90 लाख 87 हजार युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी राहिली असून, कारखान्याचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यातच प्रचंड जाणवू लागल्यामुळे ऊसतोडणी करणार्‍या मजुरांची कार्यक्षमता वाढत्या उन्हामुळे घटली आहे. गाळप हंगामाच्या सुरुवातीला किमान तीन टनांपर्यंत उसाची तोडणी करणारे मजूर वाढत्या उन्हामुळे किमान दोन टनापर्यंत उसाची तोडणी करीत आहेत.

गाळप हंगामाचा आढावा घेताना कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे एक ते सव्वा लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून, 15 ते 20 मार्चपर्यंत कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून इतरही कारखाने गाळपासाठी ऊस नेत आहेत. तरीही साडेनऊ लाख टनापर्यंत उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न आहे.

Back to top button