कसबा विधानसभा पोटनिवडणूक : सदाशिव-नारायण पेठेत रासनेंना लागेल मोठा लीड | पुढारी

कसबा विधानसभा पोटनिवडणूक : सदाशिव-नारायण पेठेत रासनेंना लागेल मोठा लीड

सुनील माळी

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी, परंपरेने पक्षाकडे कल असणार्‍या भागातील प्रतिसाद, वेगवेगळ्या पक्षांमधील मतदार बाहेर काढण्याची ताकद असलेल्या आजी-माजी नगरसेवक-प्रमुख प्रतिनिधींनी केलेले आणि न केलेले काम, यांचा आढावा घेतला असता काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पूर्व भागातील हक्काच्या मानल्या गेलेल्या निवडक भागांतून चांगले मताधिक्य मिळेल, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांना हे मताधिक्य तोडून विजयी होण्यासाठी सदाशिव-नारायण-शनिवार पेठांमध्ये सणसणीत मताधिक्य मिळवावे लागेल.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसब्यामधील पोटनिवडणुकीसाठी एक लाख 38 हजार 18 एवढे म्हणजे 50.06 एवढे मतदान झाले. कसब्यामध्ये येणार्‍या चार पूर्ण आणि दोन अर्ध्या प्रभागांमध्ये कसकसे मतदान झाले ते पाहू.

प्रभाग 15 शनिवार-सदाशिव पेठ त्यातील महत्त्वाचे भाग

झालेले मतदान 52 टक्के म्हणजे 38 हजार

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, भिकारदास मारुती, शनिपार, विश्रामबागवाडा, नूमवि प्रशाला, लोखंडे तालीम, लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्ट, नारायण पेठेतील मोदी गणपती, माती गणपती, मुठेश्वर, मोतीबाग, न. वि. गाडगीळ पथ, सेवासदन. एकूण 70 हजार मतदार. त्यातील 25 हजार ब्रह्मण समाज, तर 45 हजार बहुजन समाज.

यावर मताधिक्य अवलंबून
या भागाने भाजपला कायमच साथ दिली असून, रासने यांना यंदाही तशीच अपेक्षा आहे. उमेदवारी नाकारल्याने टिळक घराण्याची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले, रासने यांचा स्वत:चा प्रभाग असल्याने त्यांचा जनसंपर्क, यासुद्धा त्यांच्या जमेच्या बाजू असतील. मात्र, विविध कारणांनी नाराज असणार्‍यांपैकी काही जणांनी ’नोटा’चा पर्याय स्वीकारला असणे शक्य आहे तसेच हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना मिळणारे प्रत्येक मत रासने यांच्या अडचणी वाढविणारे ठरू शकते. दुसरीकडे, मतदारसंघातील बहुजन समाजाशी साधलेल्या संपर्कातून रासने यांचे मताधिक्य कमी करण्याची अपेक्षा धंगेकर यांना आहे.

प्रभाग 16 कसबा – सोमवार पेठ त्यातील महत्त्वाचे भाग

झालेले मतदान 57 टक्के म्हणजे 30 हजार 128

शनिवारवाडा, सूर्या हॉस्पिटल, कसबा गणपती, पवळे चौक, साततोटी चौक, काळभैरवनाथ मंदिर, बारणे चाळ, कागदीपुरा, पीएमसी वसाहत, तरवडे चाळ, नलावडे चाळ, केईएम रुग्णालय, रास्ता पेठ, नाना पेठ, टकार गल्ली. पुनवडी नावाने वसल्या गेलेल्या मूळ पुण्याचा हा भाग असून, कोणत्याही लहान गावात असणार्‍या गावगाड्याचे दर्शन येथे घडते. शिंपी, कुंभार, सोनार, लोहार, तांबट आदी समाजांसह बारा बलुतेदार तसेच मुस्लिम समाजही येथे आहे.

यावर मताधिक्य अवलंबून
धंगेकर स्वत: निवडून आलेला हा प्रभाग असून, त्यांच्या जबरदस्त लोकसंपर्कामुळे त्यांना या प्रभागातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे, तसेच मूळ शिवसेनेचेही चांगले संघटन या भागात आहे. मात्र, हे मताधिक्य कमीत कमी कसे राहील, यासाठी भाजपने हरप्रकारे प्रयत्न केले आहेत. धंगेकर यांचे या प्रभागातील मताधिक्य कसे राहील, यावर कसब्याची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे ठरण्याची शक्यता आहे.

प्रभाग 17 रास्ता पेठ-रविवार पेठ, त्यातील महत्त्वाचे भाग

झालेले मतदान 50 टक्के म्हणजे 27 हजार 653

नाडे गल्ली, चमडे गल्ली, लक्ष्मी रस्त्यावरील अल्पना चित्रपटगृह, मक्का मशीद, मन्नू शाह मशीद, तांबोळी मशीद, पांगुळ आळी, गणेश पेठ, गोविंद हलवाई चौक, बुरुडी पूल, घसेटी पूल, लोहियानगरच्या हद्दीपर्यंतचा भाग. या प्रभागात व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. किराड, बुरूड, लोहार, ढोर, चर्मकार, काशीकापडी समाज तसेच मुस्लिमवर्गही आहे.

यावर मताधिक्य अवलंबून
काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक लोकप्रिय अशी पिढ्यान् पिढ्या लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेली घराणी या भागात आहेत. तसेच मूळ शिवसेनेचेही चांगले संघटन असून, त्या पक्षाने या भागातून पालिकेत प्रतिनिधित्वही केले आहे. हे तीनही पक्ष यंदा एकत्रितरीत्या निवडणूक लढवीत असल्याने झालेल्या साडेसत्तावीस हजार मतांपैकी चांगली मते मिळण्याची अपेक्षा धंगेकर यांना आहे. दुसरीकडे, भाजपनेही या भागात गेल्या काही काळात संघटनात्मक काम केले असून, मताधिक्य किमान राखण्याची आशा रासने यांना आहे.

प्रभाग 18 – खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ, त्यातील महत्त्वाचे भाग

झालेले मतदान 47 टक्के म्हणजे 26 हजार 600

खडकमाळ आळी, स्वारगेट पोलिस लाइन, फडगेट पोलिस वसाहत, शिवाजी रस्ता, शिवाजी रस्त्यावरील मंडईजवळील गोटीराम भय्या चौक, सुबहान शाह दर्गा, बोहरी आळी, रविवार पेठ, काची आळी, महात्मा फुले मंडई, बुधवार बाजार, घसेटी पुलावरून रामोशी गेट, टिंबर मार्केट, कस्तुरे चौक, गोविंद हलवाई चौक, शितळादेवी चौक.या प्रभागात मुख्यत: मराठा, माळी यांच्यासह बहुजन, ख्रिश्चन, तेलगूभाषक मोठ्या प्रमाणावर आहेत.

यावर मताधिक्य अवलंबून
मुळात काँग्रेसच्या पाठीशी उभ्या राहणार्‍या या भागांतील चित्र कालांतराने बदलत गेले आणि भाजपचे नगरसेवकही निवडून गेले. विधानसभेला मुख्यत: गिरीश बापट यांच्या वैयक्तिक संपर्कामुळे या भागाने त्यांना साथ दिली होती. यंदा मात्र या भागातून चांगली मते मिळण्याची धंगेकर यांना आशा आहे, तर आपल्या नगरसेवकांच्या जनसंपर्कावर रासने यांची मदार आहे. पुण्यातील समाजवादी चळवळ या भागात प्रामुख्याने रुजली, असा इतिहास आहे.

प्रभाग 19 – लोहियानगर-कासेवाडी, त्यातील महत्त्वाचे भाग

झालेले मतदान 46 टक्के म्हणजे 22 हजार 989

या प्रभागात झालेले प्रभागातील महत्त्वाचे भाग : लोहियानगर, विजय कदम चौक, रामकृष्ण सोसायटी, टिंबर मार्केट, भवानी पेठ अग्निशमन दल, विजय वल्लभ शाळा, कामगार मैदान, मटण मार्केट, एडी कॅम्प चौक. या प्रभागात प्रामुख्याने मातंग तसेच मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

यावर मताधिक्य अवलंबून
मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता मतदानातूनही दृढ झाली. मात्र, लोहियानगरने भाजपला आमदार, नगरसेवक दिल्याने झालेल्या मतदानातून आपल्यालाही चांगला वाटा मिळेल, अशी रासने यांना आशा आहे.

प्रभाग 29- नवी पेठ-पर्वती, त्यातील महत्त्वाचे भाग

झालेले मतदान 50 टक्के म्हणजे 38 हजार

दत्तवाडी, राजेंद्रनगर, आंबिल ओढा परिसर, मांगीरबाबा चौक, अग्रेसन हायस्कूल, म्हसोबा चौक, बाल शिवाजी मंडळ, पीएमसी कॉलनी, विजयानगर कॉलनी, लोकमान्यनगर, सेनादत्त पेठ. या प्रभागात मराठा तसेच बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

यावर मताधिक्य अवलंबून
प्रभागातील मराठा अन् बहुजन मतदार आपल्यामागे उभा राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला आहे; तर विद्यमान नगरसेवकाची मदत आपल्याला होईल, अशी आशा भाजपला आहे. बहुजन मतदार विधानसभेला नेमकी काय भूमिका घेतो, यावर प्रभागाचा कल अवलंबून राहील.

Back to top button