पुणे : कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी | पुढारी

पुणे : कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी

निमोणे : पुढारी वृत्तसेवा : निमोणे (ता. शिरूर) भागातील शेतकर्‍यांनी यंदा उधार-उसनवारी करून कांद्याची लागवड केली आहे. मात्र, आता बाजारात माल येण्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर मातीमोल भावात विक्री होत असल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण धोक्यात
आले आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत शेतात पाणी साचून होते. बहुतांश शेतकर्‍यांची कांदा रोपे अक्षरशः सडून गेली होती. यंदा कांदा रोपांचा तुटवडा असल्यामुळे बाजारभाव चांगला राहील या भावनेने शेतकर्‍यांनी उधार-उसनवार करून कांदा लागवडी केल्या होत्या.

मागील दोन वर्षे कांदा पिकाला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे आणि यंदा रोपांची कमतरता असल्यामुळे कांद्याला चांगला बाजार राहील, ही शेतकर्‍यांची धारणा होती. मात्र, सध्या मातीमोल भावाने कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. शिरूर तालुक्याला कांद्याचे आगार समजले जाते. येथील बाजारपेठा या कांद्यावरच फुलतात. शेतकर्‍यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून आहे.
आज खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मजुरी, तणनाशक यांचे गणित बिघडले आहे. विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतानाही शेतकरी परिवर्तन घडेल, या आशेने ऋण काढून कांद्याची लागवड करतो. एक एकर कांद्याचा उत्पादन खर्च चाळीस हजारांवर आहे आणि आज अक्षरशः कांदा तीन ते चार रुपयांनी कांदा विकला जात असल्यामुळे शेतकर्‍यांना वाहतूक खर्चही खिशातून करण्याची वेळ आली आहे.

सगळ्यात प्रथम कांदा हा जीवनावश्यक वस्तूंमधून काढून टाकला पाहिजे. निर्यात आणि हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगेल. कांद्याच्या बाजारभावासाठी सरकारने तातडीने भूमिका घेतली नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल.
                                                                    संतोष लंघे, सरपंच, लंघेवाडी.

Back to top button