दीड वर्षात साकारणार 18 मजली इमारत; महापालिका नवीन इमारत पायाभरणीचे काम अंतिम टप्प्यात

दीड वर्षात साकारणार 18 मजली इमारत; महापालिका नवीन इमारत पायाभरणीचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची 18 मजली पर्यावरणपूरक नवीन प्रशासकीय इमारतीच्या पाया भरणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इमारतीचे बांधकाम आणखी दीड वर्षे चालणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागांना या इमारतीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.

पिंपरी येथील महापालिकेची सध्याची चार मजली इमारत अपुरी पडत आहे. अनेक विभागांना इमारतीमध्ये जागाच उपलब्ध नसल्याने इतर कार्यालयात कामे सुरू आहेत. अनेक अधिकारी व कर्मचार्यांना अपुर्या जागेत कामे करावी लागत आहेत. त्यामुळे चिंचवड येथील सायन्स पार्क समोर डी मार्ट शेजारी असलेल्या महापालिकेच्या 8.65 एकर जागेत नव्या इमारतीचे काम 13 जानेवारी 2023 ला सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 286 कोटी 84 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

हैदराबादच्या केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत काम सुरू आहे. येथे अठरा इमारतींचे दोन विंग आणि 6 मजली इमारतीचे दोन विंग असणार आहेत. एकूण 91 हजार 459 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. खडक असल्याने स्फोट करून खोदकाम करावे लागले. हे काम अनेक महिने सुरू होते. आता पायाभरणीचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे.

पायाभरणीनंतर पिलर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची मुदत 3 वर्षे आहे. आता 1 वर्षे 5 महिन्यांचा कालावधी संपला आहे. उर्वरित 1 वर्षे 7 महिने कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर विद्युत जोडणी, फर्निचर, सुशोभीकरण आणि इतर कामे केली जाणार आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंर या ठिकाणी महापालिकेच्या सर्व विभागाचे कामकाज सुरू करण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

…अशी आहे इमारतीची रचना

ही इमारत पर्यावरणपूरक आहे. येथील सभागृहाची क्षमता 450 लोक बसतील इतकी आहे. इमारतीमध्ये विविध सोयीसुविधा असणार आहेत. नागरिकांचा सर्वांधिक प्रतिसाद असलेल्या विभाग पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. आयुक्तांचे दालन 18 व्या मजल्यावर असणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व विविध विषय समितीचे सभापतीचे तसेच, गटनेत्यांची दालने 17 व्या मजल्यावर असणार आहेत. अधिकारी आणि व विविध विभागांचे कार्यालये व दालने विविध मजल्यांवर असणार आहेत.

इमारतीमध्ये भव्य प्रवेशद्वार, वेटिंग एरिया, महत्त्वाच्या व्यक्तीचे प्रवेशद्वार, महापालिका सर्वसाधारण सभागृह, ग्रंथालय, प्रदर्शन हॉल, बहुउद्देशीय हॉल, एटीएम सेंटर, क्लिनिक, पत्रकार कक्ष, कँटीन, ई-गव्हर्नन्स, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष, कोर्ट यार्ड, स्वच्छतागृह, माहिती कक्ष आदी सुविधा व कक्ष असणार आहेत. तसेच, 3 हजार 700 दुचाक्या आणि 650 चारचाकी वाहने पार्क करता येतील, इतकी प्रशस्त पार्किंग सुविधा देण्यात येणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news