‘एनसीईआरटी’च्‍या ‘त्‍या’ निर्णयावर खा. ओवेसी म्‍हणतात, “बाबरी मशिदीबाबत …”

आयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी
आयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एनसीईआरटीच्या इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या नव्या पुस्तकात बाबरी मशिदीचा उल्लेख 'तीन घुमटांची वास्तू' असा करण्यात आला आहे. यावर आज ( दि. १८) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "'एनसीईआरटी'ने बाबरी मशिदीच्‍या जागी "तीन घुमट रचना" असा शब्‍द प्रयोग करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच अयोध्या निकालाला "सहमतीचे" उदाहरण म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना बाबरी मशीद पाडल्याबद्दल माहित असले पाहिजे आणि त्यांनी "गुन्हेगारी कृत्यांचे गौरव" करू नये."

नेमकं प्रकरण काय?

एनसीईआरटीच्या १२ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशिदीचे नाव काढून टाकण्यात आले आहे. आता नवीन पुस्तकात तिचे वर्णन तीन घुमट रचना असे करण्यात आले आहे. अयोध्येवरील धडा चार पानांवरून फक्त दोन पानांचा करण्यात आला आहे. त्यात राम मंदिर उभारणीच्या संघर्षाची कहाणी आहे. सोमनाथची रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, अयोध्येतील हिंसाचार यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुन्या पुस्तकात 16 व्या शतकात मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद बांधल्याचा उल्लेख आहे.

जुन्या पुस्तकात काय उल्लेख होता?

1528 मध्ये श्री राम जन्मस्थानावर तीन घुमट रचना बांधण्यात आली होती. संरचनेत अनेक हिंदू चिन्हे असल्याचा उल्लेख अध्यायात करण्यात आला होता. आतील आणि बाहेरील भिंतींवर शिल्पे होती. फैजाबाद जिल्हा न्यायालयाने मशीद उघडण्याचा निर्णय घेतल्याचे जुन्या पुस्तकातील दोन पानांमध्ये म्हटले आहे. तेव्हापासून येथे अनेक घटना घडल्या. 1992 मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रा काढण्यात आली होती आणि कारसेवकांमुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर 1993 मध्ये जातीय दंगली झाल्या होत्या.

काय म्‍हणाले होते NCERT प्रमुख?

द्वेष आणि हिंसा हे शिक्षणाचे विषय नाहीत, शालेय पाठ्यपुस्तकांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करू नये. गुजरात दंगल आणि बाबरी मशीद विध्वंसाचे संदर्भ शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदलण्यात आले, कारण दंगलीबद्दल शिकवल्याने हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक तयार होऊ शकतात, असे एनसीआरटी (NCERT) चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले होते की, पाठ्यपुस्तकांमधील बदल हा वार्षिक पुनरावृत्तीचा भाग असून तो गोंधळाचा विषय नसावा. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गुजरात दंगली किंवा बाबरी मशीद पाडल्याच्या संदर्भांबद्दल विचारले असता सकलानी म्हणाले, "शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलींबद्दल का शिकवायचे? आम्हाला हिंसक आणि निराश व्यक्ती नव्हे तर सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत. विद्यार्थी आक्षेपार्ह बनतील, समाजात द्वेष निर्माण करतील किंवा द्वेषाचे बळी बनतील? हा शिक्षणाचा उद्देश आहे का? अशा लहान मुलांना आपण दंगलीबद्दल शिकवले पाहिजे का? शालेय पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर काय करायचे हे समजू द्या. आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत आणि आमच्या पाठ्यपुस्तकांचा हाच उद्देश आहे. द्वेष आणि हिंसा हे शिकवण्याचे विषय नाहीत; ते आमच्या पाठ्यपुस्तकांचे केंद्रबिंदू नसावेत," असे सकलानी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news