पुणे : कल्याण दरवाजा मार्गाचा होणार विकास ; सिंहगडाची आमदार तापकीर, अधिकार्‍यांकडून पाहणी | पुढारी

पुणे : कल्याण दरवाजा मार्गाचा होणार विकास ; सिंहगडाची आमदार तापकीर, अधिकार्‍यांकडून पाहणी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : अलीकडच्या काळात देशभरासह विदेशातील पर्यटक, गिर्यारोहक मोठ्या संख्येने सिंहगडावर येत आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी शिवकालीन कल्याण दरवाजा पायी मार्गासह गडाच्या सभोवतालच्या इतर पायी मार्गांचाही विकास करण्यात येणार आहे. आमदार भीमराव तापकीर, शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ व ग्रामस्थांसह शनिवारी कल्याण दरवाजा पायी मार्गाची पाहाणी केली. या मार्गाच्या विकासासाठी आमदार तापकीर यांनी पुढाकार घेतला आहे.

ते म्हणाले की, सिंहगडावर सुटीच्या दिवशी वीस ते पंचवीस हजारांवर पर्यटक येतात. वर्षभरात सर्वात अधिक पर्यटकांची गर्दी होणारे देशातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून सिंहगडाची ओळख आहे. गडावर जाण्यासाठी असलेले आतकरवाडी पायी मार्ग तसेच वाहनांसाठीचा घाटरस्ता अपुरा पडत आहे. वाहतूक कोंडीमुळे, तसेच पायथ्यापर्यंत उंच्चाकी गर्दी होते, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. या पायी मार्गाचा विकास केल्यास पर्यटक, गिर्यारोहकांना ऐतिहासिक व वनपर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. सिंहगडचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, दत्ता जोरकर, अनिरुद्ध यादव, गणेश गोफणे, राजेंद्र डिंबळे, राजू दिघे, दीपक रजपूत, अजय मुजुमले आदी पाहणी दौर्‍यात सहभागी झाले होते.

कल्याण दरवाजाच्या कड्याची भीती
सिंहगडच्या कल्याण दरवाजालगतच्या धोकादायक कड्याची भीती स्थानिक ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून सतावत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात ट्रेकिंग करताना कड्याच्या दरडीखाली चिरडून एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. गडावर खाद्यपदार्थ विक्री करणारे स्थानिक रहिवाशी कल्याण दरवाजा मार्गे ये-जा करतात. सध्या पाऊस नसला, तरी पावसाळ्यात उन्मळून आलेल्या कड्याच्या दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे या मार्गाने सुरक्षित ये-जा
करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे आहे.
सिंहगडाच्या विकास व संवर्धनासाठी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. कल्याण दरवाजासह तटबंदी बुरूज, तळ्यासह गडाच्या मेटावरील कोळीवाड्यात पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.
भीमराव तापकीर, आमदार

Back to top button