पुणे : संलग्न महाविद्यालयांवर बडगा ! प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मागता येणार दाद | पुढारी

पुणे : संलग्न महाविद्यालयांवर बडगा ! प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मागता येणार दाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांबाबत आता तक्रार प्राप्त झाल्यास विद्यापीठस्तरावर अशा तक्रारींची चौकशी करून संबंधित महाविद्यालयांची मान्यता काढणे किंवा शिस्तभंगविषयक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांवर कारवाई करण्यास टाळटाळ करणारे विद्यापीठ प्रशासन आता कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न व स्वायत्त महाविद्यालये/ मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध तक्रारी प्राप्त होतात. यामध्ये साधारणत: वेतन न मिळणे, वेतन कमी मिळणे, सेवापुस्तक, वेतन चिठ्ठी न मिळणे, वरिष्ठांकडून त्रास, नोकरीतून काढून टाकणे इत्यादी व्यक्तिगत स्वरूपाच्या तक्रारी असतात. अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आणि त्यांचे संबंधित व्यवस्थापन यांच्यामधील सेवासंबंधीची गार्‍हाणी किंवा तक्रारींच्या निवारणासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये/ मान्यताप्राप्त परिसंस्थातील अध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आता संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे.

संलग्न महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था यामध्ये प्रशासकीय विद्याविषयक अथवा वित्तीय कामकाजासंबंधी अनियमितता किंवा विवाद असेल व त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या अध्यापकवर्गाच्या व अध्यापकेतर कर्मचारीवर्गाच्या हितास बाधा येत असेल, तर अशा सामाईक स्वरूपाच्या तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्यास, विद्यापीठस्तरावर अशा तक्रारींची चौकशी करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 120 नुसार संलग्नीकरण अथवा मान्यता काढून घेण्याची किंवा सन 2019 चा एकरूप परिनियम क्र.1 नुसार संबंधित कसूरदार संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्यावर शास्तीभंगविषयक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विविध प्राधिकरणांकडे त्यांच्या तक्रारींसाठी आता दाद मागता येणार आहे.

कुणाकडे मागता येणार दाद
1) विद्यापीठाशी संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांचे आणि मान्यताप्राप्त संस्थांचे अध्यापक व इतर कर्मचारी आणि संबंधित व्यवस्थापन यांच्यामधील विवादांसाठी विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येणार आहे.
2) विद्यापीठाशी संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांचे आणि मान्यताप्राप्त संस्थाचे अध्यापक व इतर कर्मचारी यांच्या राज्य शासन व त्यांचे अधिकारी यांच्या विरुध्दच्या तक्रारी व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी लागणार आहे.
3)व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणारी महाविद्यालये मान्यताप्राप्त परिसंस्थांतील अध्यापक व इतर कर्मचारी यांच्या तक्रारींसाठी एआयसीटीई अन्वये गठित संबंधित महाविद्यालय पातळीवरील समितीकडे दाद मागता येणार आहे.

Back to top button