पुणे : प्रश्नपत्रिकांतील चुकांबाबत कारवाई होणार | पुढारी

पुणे : प्रश्नपत्रिकांतील चुकांबाबत कारवाई होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी आणि हिंदी विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुका झाल्या आहेत. या चुकांबाबत राज्य मंडळाकडून नियामकांच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे समोर आले. त्यात प्रश्नपत्रिकेतील ए 3 आणि ए 5 या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए 4 या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. तर, हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दांसाठीचे अनुक्रमांक चुकले होते. प्रश्न क्रमांक दोनमध्ये विरुद्धार्थी शब्दांसाठी 1,2,1,2 असे देण्यात आले होते. समानार्थी शब्दांसाठी 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात आले होते. त्यामुळे या गंभीर चुकांबाबत संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

प्रश्नपत्रिकांतील चुकांसंदर्भातील कारवाईबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, मुख्य नियामकांच्या अहवालानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र, सकृतदर्शनी या चुका मुद्रणस्तरावरच्या दिसतात. त्यामुळे मुद्रकाला दंड केला जाऊ शकतो. तसेच शिक्षकाची चूक असेल तर संस्थेला कळवून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येते. सध्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संप सुरू असल्यामुळे नियामकांची बैठक झालेली नाही. लवकरच नियामकांची बैठक होईल. संबंधित प्रश्नपत्रिकांमधील चुकांबाबतचा अहवाल मिळेल. त्यानंतर पुढील काही दिवसांत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

Back to top button