चाकण : सुरक्षारक्षकांच्या मदतीने कंपनीवर दरोडा | पुढारी

चाकण : सुरक्षारक्षकांच्या मदतीने कंपनीवर दरोडा

चाकण; पुढारी वृत्तसेवा : सुरक्षारक्षकांच्या मदतीने कंपनीवर दरोडा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला असून, चाकण पोलिसांनी सुरक्षारक्षकासह पाच दरोडेखोरांना मुद्देमालासह बुधवारी (दि. 22) ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. चाकण येथील दावड मळ्यातील टेक्नो ड्राय सिस्टीम इंजिनियरिंग कंपनीमध्ये शुक्रवारी (दि. 17) पहाटे दोनच्या दरम्यान ही घटना घडली होती.

गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय 36, रा. कुरुळी, रा. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गोरक्षनाथ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयास्पद म्हणून सुरक्षारक्षक दिलनवाज महमद शफी खान (वय 54, रा. दावडमळा, चाकण, मूळ रा. बिहार) याला ताब्यात घेतले. त्यानंतर या कटात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली.

चाकण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना मुंब्रा, ठाणे येथून अटक केली. मोहम्मद हनीफ मोहम्मद शफी शेख (वय 32), रिजवान अहमद अबू सामा चौधरी (वय 22), जसरुद्दीन वसीउद्दीन चौधरी (वय 23), दीपक युवरा सुरवाडे (वय 23, सर्व रा. शिळफाटा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी संगनमताने कट रचून सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी एकूण 800 किलो स्क्रॅप व सुमारे 91 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (एमएच 03, सीव्ही 4326) असा सुमारे 3 लाख, 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कंपनीतील सिक्युरिटी गार्ड दिलनवाज खान हा या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्याने वरील सर्वांना या कटात सहभागी करून घेऊन हा दरोडा टाकला. सदरची कारवाई चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे विभागाचे निरीक्षक अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, हवालदार सुरेश शिंदे, राजू जाधव, संदीप सोनवणे, पोलिस नाईक हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, भाग्यश्री जमदाडे, नितीन गुंजाळ आदींनी केली.

Back to top button