खेड शिवापूर : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद | पुढारी

खेड शिवापूर : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

खेड शिवापूर(ता. भोर); पुढारी वृत्तसेवा : वेळू येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम दि. 16 रोजी पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या पाच आरोपींना चाकण (ता. खेड) येथून अटक करण्यात आली. त्यांना राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे येथील पथकाने केली.

प्रणीत दयानंद गोसावी (वय 24, सध्या रा. धाडगेमळा, अथर्व पेंटसन बिल्डींग, चाकण. मूळ रा. चिंचणी, ता. खटाव), शुभम भाऊलाल नागपूरे (वय 22), आकाश मोडक नागपुरे (वय 22), कार्तिक मुलचंद गौपाले (वय 21, तिघेही सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, मूळ रा. आष्टी, ता. तुमसर), शुभम युवराज सरवदे (वय 19, रा. यशवंत कॉलनी नानेकरवाडी, मूळ रा. नाका डोंगरी, ता. तुमसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 रोजी पहाटेच्या वेळी वेळू (ता. भोर) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. मात्र, हा प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला आरोपी चाकण परिसरातील असल्याची खबर मिळाली. त्याठिकाणी जाऊन सदर आरोपींना अटक केली. त्यांना राजगड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वी आरोपींनी सातारा जिल्ह्यातील निसकळ गावात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तेथील सराफाचे दुकान फोडल्याची कबुली दिली.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, हवालदार अजित भुजबळ, राजू मोमीन, अमोल शेडगे, बाळा खडके, पोलिस शिपाई मंगेश भगत, अक्षय नवले, संदीप वारे यांनी केली.

Back to top button