पुणे : मराठा मतदारांवर लक्ष ; दोन्ही पक्षांचा मते खेचण्याचा प्रयत्न | पुढारी

पुणे : मराठा मतदारांवर लक्ष ; दोन्ही पक्षांचा मते खेचण्याचा प्रयत्न

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मराठा समाजाचा तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने, दोन्ही पक्षांनी येथे 28 ते 32 टक्क्यांच्यादरम्यान असलेल्या मराठा समाजावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. मराठा समाजाचे मतदार ज्या बाजूला वळतील, त्या बाजूला निवडणुकीचा निकाल झुकण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने मंगळवारी मराठा समाजाचा मेळावा घेतला, तर भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढली.

भाजपचे हेमंत रासने, तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर या दोन्ही माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. दोघेही ओबीसी समाजाचे आहेत. या मतदारसंघात यापूर्वी प्रामुख्याने ब्राह्मण आणि मराठा समाजाचे उमेदवार असत. भाजपने ब्राह्मण उमेदवाराला निवडले नसल्याने, त्यांच्याविरुद्ध नाराजी असल्याची चर्चा होती, ती दूर झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा समाजाची मतदारसंख्या पन्नास हजारांपेक्षा अधिक असल्याने, त्या समाजाला आपल्या बाजूने करण्यासाठी दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांशी सोमवारी संवाद साधला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतदारसंघाच्या सर्व भागातून सोमवारी दुचाकी रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी मेळावे घेणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, हेही प्रचाराला उतरले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्रीही प्रचारात सहभागी झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. या तिन्ही पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी आपापल्या भागावर लक्ष दिल्याचे दिसून येते.

कसबा पेठेच्या सर्व भागात मराठा समाजाची वस्ती आहे. त्यातही पूर्व भागातील पेठांमध्ये त्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. या भागातील बारा नगरसेवकांपैकी भाजपचे चार, तर शिवसेनेचा एक नगरसेवक मराठा समाजाचा आहे. या नगरसेवकांबरोबरच महापालिकेच्या आगामी निवडणुकीत इच्छुक असलेले प्रमुख कार्यकर्तेही गल्लीबोळातून तसेच घरोघरी भेटी देत मतदारांशी संपर्क करीत आहेत. भाजपने मतदारसंघाची जबाबदारी आमदार माधुरी मिसाळ आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपविली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही मतदारसंघात भेटीगाठी घेत आहेत. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर कसबा व लगतच्या पेठांची, तर आमदार भीमराव तापकीर यांच्यावर घोरपडे पेठ व लगतच्या भागाची जबाबदारी सोपविली आहे.

पुण्यातील भाजपचे बहुतेक सर्व नगरसेवक यांच्यासोबत अन्य भागातील काही आमदारही कसबा पेठ मतदारसंघात तळ ठोकून आहेत. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने आमदार संग्राम थोपटे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे संजय मोरे, गजानन थरकुडे हे शहराध्यक्षही मतदारसंघात सातत्याने फिरून कार्यकर्त्यांना सक्रिय करीत आहेत.

प्रथमच अटीतटीची निवडणूक
मराठा समाजाचे मतदार मोठ्या संख्येने असून, त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. यंदा प्रथमच ही पोटनिवडणूक अटीतटीची लढत ठरली आहे. विजयाचे पारडे कोणत्याही बाजूला झुकू शकेल, अशी चर्चा मतदारांमध्ये आहे. त्यामुळे मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची अधिकाधिक मते मिळविण्यासाठी सर्व नेत्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

 

Back to top button