जेजुरी : येळकोट येळकोट जय मल्हार! कर्‍हा स्नानासाठी लोटला भाविकांचा महापूर | पुढारी

जेजुरी : येळकोट येळकोट जय मल्हार! कर्‍हा स्नानासाठी लोटला भाविकांचा महापूर

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी आणि क-हा स्नान, कुलधर्म-कुलाचारासाठी सुमारे 3 लाख भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी खंडेरायाच्या पालखी सोहळ्यावेळी जेजुरी गडावर आणि कर्‍हा नदीवर लाखो भाविकांनी भंडार्‍याची उधळण करीत ‘सदानंदाचा येळकोट…’‘येळकोट-येळकोट जय मल्हार’असा जयघोष केला.

जेजुरी गडावर सोमवती यात्रा ही पर्वकाळ समजली जाते. सोमवारी (दि. 20) अमावस्या दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी संपणार असल्याने सकाळी 6 वाजता गडाच्या पायथ्याशी जमलेले देवाचे मानकरी, पालखी सोहळ्याचे खांदेकरी वाजतगाजत गडावर आले. सकाळी सात वाजता देवाचे मानकरी इनामदार राजेद्र पेशवे, सचिन पेशवे यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.

या वेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीसमोर निशाण, छत्र-चामर, अब्दागिरी तसेच घडशीसमाज बांधवांकडून सनईचे मंगलमय सूर निनादत होते. मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्री खंडोबा व म्हाळसादेवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या.

पालखी सोहळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी ’येळकोट येळकोट जयमल्हार’चा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेण असणारा पिवळ्या जर्द भंडार्‍याची उधळण केली. या वेळी देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्यय भाविकांनी अनुभवला. याप्रसंगी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी तसेच समस्त पुजारी, सेवेकरी, खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

भाविकांच्या भंडार्‍याच्या उधळणीत पालखी सोहळा पायरी मार्गावरून बानुबाई मंदिरमार्गे, नदी चौकमार्गाने पुढे जाऊन ऐतिहासिक छत्रीमंदिर (मल्हार-गौतमेश्वर) येथे स्थिरावला. त्यानंतर गावातून सोहळा मिरवत कर्‍हा नदीकडे मार्गस्थ झाला. हा सोहळा सकाळी साडेअकरा वाजता कर्‍हा नदीवरील पापनाशतीर्थ येथे पोहोचला. कर्‍हा नदीवर मानकरी व भाविकांनी उत्सवमूर्तींना दही-दूध व कर्‍हेच्या पाण्याने विधिवत स्नान घातले. या वेळी हजारो भाविकांनी क-हा स्नानाची पर्वणी लुटली.

कर्‍हा नदीवर योग्य नियोजन
यंदा पाऊस चांगला झाल्याने कर्‍हा नदीवरील पापनाशतीर्थाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. देवाच्या अंघोळीसाठी जागा कमी असल्याने मोठ्या संख्यने येणाऱ्या भाविकांना देवकार्य करणे अवघड होते. चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना नाकारता येत नव्हती; मात्र, जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्‍हा स्नान रंभाई शिम्पीन ट्रस्टकडून योग्य नियोजन केल्याने हा सोहळा व्यवस्थित पार पडला.

Back to top button