पुणे : लग्नानंतर सर्व दागदागिने, रोकड घेऊन नवरी फरार; तिघांवर गुन्हा | पुढारी

पुणे : लग्नानंतर सर्व दागदागिने, रोकड घेऊन नवरी फरार; तिघांवर गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विवाह झाल्यानंतर विवाहिता सासरचे सर्व दागदागिने आणि रोकड घेऊन पळून गेल्याचा प्रकार तीन तरुणांबाबत घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील एका शेतकरी तरुणाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत लुटणार्‍या नवरीविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गणेश किसन महाडिक (रा.शिंदावणे, ता. हवेली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सीमा भारती, नीलेश शंकर भारती आणि शिवांजली देशमुख (सर्व रा.वाघोली) यांच्या विरुध्द फसवणूक, अपहार आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश महाडिक हे शेतकरी असून, त्यांची सीमा आणि नीलेश यांच्याबरोबर एका लग्नात ओळख झाली होती. तेव्हा आरोपींनी त्यांना विवाहासाठी मुलगी पाहून देतो, असे सांगितले. यानंतर त्यांचा शिवांजलीबरोबर खोटा विवाह लावून दिला. यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी 2 लाख 32 हजार रुपये घेतले. यानंतर काही दिवसांतच त्यांच्या घरी येऊन ’पत्नीला सोडचिठ्ठी दे नाही तर तुझे बरे वाईट करू,’ असा दम भरला.

यानंतर 500 रुपयांच्या स्टँपपेरवर सोडचिठ्ठी झाल्याचे लिहून घेत फिर्यादीच्या पत्नीला घेऊन आरोपी निघून गेले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक घोडके यांनी सांगितले, की आरोपींनी अशाप्रकारे तीन तरुणांची फसवणूक केली आहे. आरोपी एखाद्या विवाह सोहळ्यात जातात. तेथे विवाहेच्छुक तरुणांना हेरतात. यानंतर लग्नाच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करण्यात येत होती. गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वी यवत पोलिस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे घोडके यांनी सांगितले.

Back to top button