पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यामध्ये विधान भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सारथीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक हजेरी लावली आहे.
पुण्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या सारथीच्या इमारतीची माहिती घेण्यासाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहिले. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला सारथी संस्थेचा जागेचा प्रश्न अखेर सुटला असून, शासनाने सारथी संस्थेला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील गट क्रमांक 1737 /1 मधील 4163 चौ.मी शासकीय जागा कार्यालय बांधण्यासाठी प्रदान केली आहे. यामुळे आता सारथी संस्थेला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे सादरीकरण शरद पवारांना दाखवण्यात आले.
सारथीसंबंधीत इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, या मागणीसही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना शरद पवार यांनी सूचना केल्या.