पुणे : कलाकारांच्या मदतीला धावले हैद्राबाद पोलिस दलातील महाराष्ट्राचे सुपूत्र | पुढारी

पुणे : कलाकारांच्या मदतीला धावले हैद्राबाद पोलिस दलातील महाराष्ट्राचे सुपूत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा

चार दिवसाच्या वादनासाठी सुपारी घेऊन गेलेल्या पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ६० जणांच्या पथकाला हैदराबाद येथे थांबवून ठेवल्याचा ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर शनिवारी दुपारी पुणे पोलिस व हैद्राबाद पोलिसांच्या मदतीने या पथकाची शनिवारी सायंकाळी पुण्याकडे सुखरूप रवानगी झाली. आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबतची माहिती हैदराबाद पोलिस दलातील राचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांना दिली होती.

याबाबत दैनिक ‘पुढारी’शी बोलताना भागवत यांनी सांगितले की, त्यांना ज्या माणसाने वादनासाठी येथे बोलावले होते. तो दुसरीकडे गेला होता. पोलिसांचे पथक पाठवून त्याला शोधून आणले. त्याने ठरल्याप्रमाणे ढोल पथकाचे पैसे दिले. त्यानंतर सर्वांच्या जेवणाची सोय करून, त्याना सुखरूप पुण्याकडे पाठवले आहे.

याबाबत स्वामी ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शुभंकर वायचळ म्हणाले की, एका इव्हेंट कंपनीच्या प्रेमानंद यादव यांनी सिकंदराबाद परिसरात ढोल ताशा वादनाची ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार आम्ही १६ मुलीसह ६० जणांचे पथक १५ सप्टेंबर रोजी पुण्यातून निघालो. १६ सप्टेंबर रोजी तेथे पोहचलो.

हैदराबाद, सिकंदराबाद येथे १६, १७, १८ व १९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये गणपतीसमोर वादन केले. मात्र आयोजकांना ही सुपारी परवडली नसल्याचे सांगून त्यांनी आणखी ३ दिवस वादन करण्यास सांगितले. पथकाच्या गाडीची कागदपत्रे त्यांनी काढून घेतली होती.

आणखी तीन दिवस वादन करा. त्याशिवाय सोडणार नाही, असे सांगितले. शेवटी पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे तसेच नितिन परदेशी यांच्यासह अनेकांना संपर्क केला. हैदराबाद येथील नगरसेविका पुजारी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मदत करुन पोलीस उपायुक्तांच्या कानावर ही बाब घातली.

त्यानंतर महाराष्ट्राचे सुपूत्र हैदराबाद पोलिस दलातील पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सूत्रे गतिमान करत पथकाला मदत केली. तसेच त्यांचे पैसे मिळवून देण्यापासून ते सुरक्षीत पुण्याकडे रवाना करण्यास मदत केल्याचे वायचळ यांनी सांगितले

Back to top button