स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ची पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात | पुढारी

स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ची पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशात स्वच्छतेच्या बाबतीत आता जागरुकता निर्माण झाली असून युवा पिढी स्वतःहून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुकवारी स्वच्छ भारत अभियान (शहरी भाग) टप्पा – २ च्या शुभारंभ प्रसंगी केले.

अभियानाअंतर्गत देशातील पाचशे शहरांमध्ये वेस्ट मॅनेजमेंट यंत्रणा मजबूत करणे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगली करणे आदी कामांवर भर दिला जाणार आहे.

शौचालयांची निर्मिती करुन, स्वच्छता अभियान चालवून देशाने स्वच्छ भारत अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता आपले लक्ष्य शहरांना कचरामुक्त करणे हे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ सोबत अमृत मिशनदेखील राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ज्या गोष्टी साध्य झाल्या आहेत, ते पाहता प्रत्येक भारतवासी आपल्या कर्तव्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. आपले स्वच्छता कर्मचारी हे खर्‍या अर्थाने या अभियानाचे महानायक आहेत.

कोरोना संकटाच्या काळातही त्यांनी आपले काम अतिशय जबाबदारीने पार पाडले आहे. शहरांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. अलिकडेच ऑगस्ट महिन्यात सरकारने स्क्रॅपेज धोरण लाँच केलेले आहे. या धोरणानुसार वेस्टपासून वेल्थ निर्मिती केली जाणार आहे.

लोक आपल्या घरातच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवत आहेत. याशिवाय इतर लोकांनाही ते स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक करीत आहेत असे मोदींनी सांगितले.

यात कोरोनाच्या काळात काही प्रमाणात सुस्ती आली असली तरी प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर आणि गावांच्या प्रशासनांनी आता जागे झाले पाहिजे. सिवेज आणि सेप्टिक व्यवस्थापनाची गरज असून पाण्याच्या दृष्टीने शहरे सुरक्षित झाली पाहिजेत. नद्यांचे रुपांतरण नाल्यांत होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्ष असले पाहिजे. शहरांचा विकास झाला तर असमानता दूर होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत होते.

चांगल्या जीवनमानासाठी लोक शहरांमध्ये येतात. त्यांना शहरांत रोजगार मिळतो आणि गावांच्या तुलनेत जीवनस्तरही सुधारतो. स्वच्छ भारत मिशन आणि अमृत मिशनचा पुढचा टप्पा म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.ॉ

हेही वाचलंत का? 

Back to top button