सुरक्षा दलांमध्ये मराठी गर्जना! पुणेकर लष्करप्रमुखांनंतर नांदेडचे सुपूत्र हवाई दल प्रमुख | पुढारी

सुरक्षा दलांमध्ये मराठी गर्जना! पुणेकर लष्करप्रमुखांनंतर नांदेडचे सुपूत्र हवाई दल प्रमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुरक्षा दलांमध्ये मराठी गर्जना : देशातील हवाई आणि भुदल सुरक्षा दलांच्या प्रमुखपदी राज्यातील दोन मातब्बर अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचावली आहे.

हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. व्ही. आर. चौधरी हे नांदेडचे सुपूत्र आहेत. यापूर्वी लष्कर प्रमुखपदी मनोज मुकुंद नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ मध्ये स्वीकारला आहे. यामुळे दोन मराठी अधिकारी देशातील दोन सुरक्षा दलांचे प्रमुख आहेत ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.

विद्यमान हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे येत्या 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्‍त होत आहेत. त्यानंतर चौधरी यांच्या हाती हवाई दलाची सगळी सूत्रे असतील. चौधरी हे ऑगस्ट 2020 पासून हवाई दलाच्या वेस्टर्न कमांडचा कार्यभार सांभाळत आहेत.

लढाऊ वैमानिक म्हणून चौधरी यांनी डिसेंबर 1982 मध्ये हवाई दलातील सेवेस सुरुवात केली होती. लढाऊ आणि प्रशिक्षणार्थी लढाऊ विमाने उडविण्याचा त्यांच्याकडे 3800 तासांपेक्षा जास्त अनुभव आहे. मिग 21, मिग 23 एमएफ, मिग 29, सुखोई 30 यासह इतर लढाऊ विमाने त्यांनी चालविली आहेत. लडाख सीमेवर हवाई सुरक्षेची जबाबदारीही त्यांनी पार पाडलेली आहे.

सुरक्षा दलांमध्ये मराठी गर्जना : लष्कर प्रमुख पुणेकर मनोज मुकुंद नरवणे

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी आज विराजमान झाले. नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले असून त्यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते  ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले.

आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button