मंचर; पुढारी वृत्तसेवा : घोडेगाव (ता. आंबेगाव, जि.पुणे) येथे भंगार विकलेल्या पैशांच्या वादातून एकाने पती-पत्नीचा खून केला. किसन विकास वाघ (वय ४५) आणि पत्नी मोंढाबाई ( वय ४१) अशी खून झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीचा खून प्रकरणी तीन संशयित आरोपींना घोडेगांव पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली आहे.
मंगेश शकील सईद, सोन्या जगण मुकणे, जगण मुकणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी( दि. २८) मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे आणि जगण मुकणे यांचा किसन वाघ यांच्याशी वाद झाला. भंगार विकलेल्या पैशांच्या कारणावरुन हा वाद झाला होता. हे तिघे शिवीगाळ दमदाटी करु लागले.
त्यावेळी किसन यांचा भाऊ संजय वाघ यांनी त्यांच्यामधील भांडणे सोडविली. त्यानंतर ते सर्वजण तेथून निघून गेले.
मंगेश सईद याने किसन वाघ यांना तुला आम्ही बघून घेतो. तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वीटभट्टी मालक संजय शिंदे यांनी वाघ दाम्पत्य जखमी झाल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, किसन वाघ आणि त्यांची पत्नी मोंढाबाई वाघ यांना कोणीतरी मारहाण केली आहे. ते राहत असलेल्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडून आहेत.
संजय वाघ त्यांच्या पत्नीसह किसन वाघ राहत असलेल्या घोडेगाव येथील स्मशानभूमी कचरा डेपो जवळ गेले. तेथे त्यांचा भाऊ किसन वाघ आणि भावजय मोंढाबाई वाघ हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर जखमा होत्या.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी किसन वाघ आणि मोंढाबाई वाघ यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत किसन वाघ यांचा भाऊ संजय वाघ यांनी मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे, जगण मुकणे (सर्व रा. घोडेगाव ) यांच्या विरोधात फिर्याद दिली. घोडेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २९) पहाटे फिर्याद दिली.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक मिथेश गट्टे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांभाते यांनी भेट दिली .तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने करीत आहे.
हेही वाचलं का?