पुणे : एसटीमध्ये लुटणारी टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : एसटीमध्ये लुटणारी टोळी जेरबंद

यवत/ पाटस पुढारी वृत्तसेवा : एसटीमध्ये लुटणारी टोळी जेरबंद : पाटस (ता.दौंड) ढमाले वस्ती येथे एसटी बस मधील प्रवाशांकडील १ कोटी १२ लाख रुपयांचा ऐवज लुटलेल्या आरोपींना अटक करण्यात आले आहे. या आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना सिने स्टाईलने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एन्ट्री करत आरोपींना अटक केली.

पाटस येथील एसटी बस मधील चोरीचा गुन्हा हा वरुडे येथील गणेश भोसले व त्याचा भाऊ रामदास भोसले यांनी साथीदारांसह केला. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला कळल्याने रामदास भोसले हा खराडी बायपास येथून त्यांच्या साथीदारासह पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. तेव्हाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खराडी बायपास येथे जाऊन रामदास भाऊसाहेब भोसले, (वय-३०) व तुषार बबन तांबे (वय-२२) हे दोघे राहणार वरुडे ता. शिरूर जि.पुणे व भरत शहाजी बांगर (वय -३६ रा.गणेगाव खालसा ता. शिरूर जि.-पुणे) यांना पकडण्यात आले आहे.

प्रवाशांना मारहाण करीत ऐवज लुटला

आम्ही पोलिस आहोत, तुम्ही दोन नंबरचा धंदा करता का? चला खाली उतरा असे म्हणत एसटी बसमधील चार प्रवाशांना मारहाण करीत १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रूपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. यातील चोरट्यांचा शोध पोलिसांनी लावलेला असून यात सहा आरोपी असून यातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. तर उर्वरित आरोपींचा शोध लवकरच लावण्यात येईल असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यातील संशयित आरोपी हे पोलिस वेशात आले असल्याने त्यांचा शोध घेणेचे पोलिसांना समोर मोठे आव्हान होते. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली. काही महत्वाच्या धागे दोऱ्यांनी तीन संशयित आरोपी पर्यत पोहचनण्यात त्यांना यश आले आहे.

हे आहेत तीन आरोपी

पकडण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे अशी की, रामदास भाऊसाहेब भोसले,तुषार बबन तांबे,भरत शहाजी बांगर असून शिरूर तालुक्यातील रहिवाशी असून यांच्याकडून चारचाकी गाडी ,बुलेट मोटारसायकल व लुटीतील १ कोटी ५४ हजार चा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारा परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

हा प्रकार मंगळवार दि.३ रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पाटस ता.दौंड हद्दीत घडली आहे. याबाबत चार अज्ञात चोरट्याविरोधात यवत पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लुटण्यात आलेले प्रवासी हे लातूर येथील न्यु इंडीया कुरीअर सर्विसचे काम करीत होते. ते आठवाडा पास कडून नियमित एसटी बसने प्रवास करीत होते चोरट्यानि ही चोरी करण्यासाठी साधारणपणे दीड महिन्यांपासून हे आरोपी नियोजन करत असून ते या लोकांवर पाळत ठेऊन होते.

लुटण्यात आलेले प्रवासी हे निलंगा ते भिवंडी एस.टी बस ने प्रवास करती असताना पाटस येथील ढमाले-वस्ती मंगळवार दि. ३ रोजी च्या मध्यरात्री १:१५ वाजता चोरट्याने पोलीस व्यशात बस मध्ये जाऊन त्यांना खाली उतरून पोलिस धाक धकवून चोरट्याने लुटले होते. तेव्हा या प्रवाशांना हे पोलिस नसल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण चोरट्याने त्यांना ढकलून देत प्रवाशांकडील रोख रक्कम, मोबाईल व मेटल पार्सल घेऊन पळून गेले होते.

चोरट्यांनी या वस्तुंची केली चोरी

चोरट्यानि चोरून नेहलेला माल असा होता की, हितेंद्र जाधव यांच्या २६ लाख रुपये व व १० हजार रुपये किमतीचा कंपनीचा मोबाईल फोन,व तेजस धनाजी बोबडे यांच्याकडील २५ लाख ६२ हजार ५७० रुपये. व विकास जनार्दन बोबडे यांचे कडील २९ लाख ४९ हजार ८६० रुपये रक्कम व १ लाख १५ हजार रुपये किमतीचे मेटल पार्सल व संतोष मनोहर बोबडे यांच्या कडील ३० लाख रुपये व १५० ग्रॅम वजनाचे मेटल पार्सल असा एकूण मिळून १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपयांची रोख रक्कम व मेटल पार्सल असा ऐवज घेऊन चोरटे फरार चो झाले होते. यावेळी पोलिसांनी संशयित चोरट्यांचे चित्र रेखाटन केले होते.

आरोपी वाढणार

या गुन्ह्याची तीव्रता मोठी असल्याने अजून काही आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचलत का :

हे पहा :

प्रियांका चोप्रा आणि कोल्हापुरी स्ट्रॉंग वुमन

Back to top button