पुणे : पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने मित्राचा आवळला गळा - पुढारी

पुणे : पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने मित्राचा आवळला गळा

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पत्नीबाबत अश्‍लिल कमेंट केल्याने संतप्त झालेल्या एकाने मित्राचाच गळा आवळून खून केला. ही घटना सुस, मुळशी (पुणे) येथे उघडकीस आली.

अच्युत भुयान (वय ३७) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमल राजन शर्मा (१८, दोघेही रा. सूस रोड, बाणेर, पुणे) याला अटक केली आहे.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अच्युत भुयान याने आरोपी शर्मा याच्या पत्नीबाबत अश्‍लील कमेंट केली होती. याचा राग आरोपीच्या मनात होता.

दरम्यान, आरोपी आणि मयत हे दोघेजण दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी मयत अच्युत याने पुन्हा आरोपीच्या पत्नीबाबत अश्‍लिल कमेंट केली.

या कारणावरून संतापलेल्या आरोपी शर्मा याने लांब रूमालाच्या सहाय्याने अच्युत याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो कामावर गेला. आरोपी शर्मा आणि मयत शर्मा हे दोघेजण एका सुरक्षा एजन्सीमध्ये कामाला होते. सोमवारी (दि. २०) रात्री स्वयंपाक बनविणारी महिला आरोपीच्या घरी आली असता खूनाचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांकडे आरोपीबाबत कोणताही पुरावा नव्हता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि एका लहान मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयाची सुई आरोपी शर्मा याच्याकडे वळाली.

आरोपी मूळगावी आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना हिंजवडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत त्याला बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button