बेल्हे : आगीत मजुराचे घर खाक; रमेश शिंदे यांचा संसार उघड्यावर | पुढारी

बेल्हे : आगीत मजुराचे घर खाक; रमेश शिंदे यांचा संसार उघड्यावर

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : आणे पठारावर असलेल्या शिंदेवाडी येथील मजुरी काम करणार्‍या रमेश बाळू शिंदे यांच्या राहत्या घराला मंगळवारी (दि. 14) अचानकपणे आग लागल्याने घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रोजंदारीवर संसाराचा गाडा हाकत कशीबशी निवार्‍याची सोय शिंदे यांनी केली होती; परंतु घर जळाल्याने रमेश शिंदे यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या परिवारापुढे सध्या संकट कोसळल्याने पुन्हा घर कसे उभारावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रमेश व त्यांचा परिवार मजुरीसाठी शिंदेवाडीतील इटकाईमळा येथे एका शेतात कामासाठी राहत होते. मंगळवारी पहाटे अचानक घराला आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व वर्षाचा अन्नधान्य साठा, घरावरील सर्व साहित्य तसेच त्यांची मोटारसायकलही या आगीत जळून खाक झाली.

सुदैवाने रमेश हे परिवारासह कामासाठी शेतावरच थांबले होते. घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अंदाजे या जळीत घटनेत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आणेचे तलाठी गारकर यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

Back to top button