कौतुकास्पद ! स्वयंपाकीचा मुलगा झाला अमेरिकेत शेफ; वर्षाला आहे एवढे पॅकेज… | पुढारी

कौतुकास्पद ! स्वयंपाकीचा मुलगा झाला अमेरिकेत शेफ; वर्षाला आहे एवढे पॅकेज...

लोणी धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये स्वयंपाक करणार्‍याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेत हॉटेल मॅनेजमेंटची पदवी संपादन केली आणि अमेरिकेतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी मिळवली. त्याला सुरुवातीलाच वार्षिक 40 लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज मिळाले आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

अखिल सुभाष रोडे असे यश संपादन करणार्‍या मुलाचे नाव आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी या छोट्याशा खेड्यातील सुभाष भाऊ रोडे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. तसेच घरची शेती पाहून त्यांनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. थोरला मुलगा सुरज याने संगणक अभियंत्याची पदवी मिळवून आयटी कंपनीत काम करीत आहे.

धाकटा मुलगा अखिल याने डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी संपादन केली. नुकतीच त्याला अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजलीस शहरात मार्गारिटाव्हिले या पंचतारांकित हॉटेलमध्ये लाईन शेफ म्हणून नोकरी मिळाली आहे.
सुरुवातीलाच त्याला वार्षिक 40 लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज मिळाले आहे. अखिल हा युरोपीय देशातील पदार्थ बनविण्यात पारंगत आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पोंदेवाडीत झाले.

11वी, 12वी पारगाव येथे झाली. अखिल दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेसाठी रवाना झाला. पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपसरपंच महेंद्र पोखरकर, उद्योजक संदीप पोखरकर व अखिलचे आई-वडील उपस्थित होते.

Back to top button