कात्रज : रुंदीकरणाच्या कामास गती द्यावी : आ. भीमराव तापकीर | पुढारी

कात्रज : रुंदीकरणाच्या कामास गती द्यावी : आ. भीमराव तापकीर

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : ‘कात्रज चौक ते नवले पूल दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण संथगतीने सुरू आहे. जिथे कामास कोणताही अडथळा नाही तिथे देखील काम वेगाने होताना दिसत नाही. अधिकार्‍यांनी या कामाला गती द्यावी,’ अशी सूचना आमदार भीमराव तापकीर यांनी केली. कात्रज चौक ते नवले पूल रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणाच्या कामाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.

माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, अरुण राजवाडे, संदीप बेलदरे, कुणाल बेलदरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, उपअभियंता महेश पाटील, शाखा अभियंता सलीम शेख, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे आदी या वेळी उपस्थित होते.

तापकीर म्हणाले, ‘चांदणी चौकात ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे, त्याप्रमाणे हे कामदेखील झाले पाहिजे. कामाची मुदत संपत आली तरी अतिक्रमणे दिसत आहेत. अधिकार्‍यांनी हे काम जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण करावे.’  शंकरराव बेलदरे म्हणाले, ‘दत्तनगर भुयारी मार्गलगतची अतिक्रमणे हटवून सेवा रस्ते करणे आवश्यक आहे.’ हे काम गतीने पूर्ण होणे गरजेचे असल्याचे राजवाडे यांनी या वेळी सांगितले.

सेवा रस्ते चोरीला गेले का?
राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यामध्ये पाणी, ड्रेनेज, वीजवाहिन्या टाकण्यात येत आहेत. तीस वर्षांपूर्वीच्या विकास आराखड्यातील सर्व्हिस रस्त्यांचे बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी कागदावर ठेवले आहे का? नागरिकांच्या सेवेसाठी ते का नाही? महापालिकेचे सर्व्हिस रस्ते चोरीला गेले आहेत का? असे प्रश्न आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केले.

महापालिका प्रशासनाकडून सेवा लाईनच्या कामास दिरंगाई होत आहे. याबाबत पत्रव्यवहार करूनही 200 फूट रस्त्यात येणारे होर्डिंग, पत्र्याची शेड, टपर्‍या व अन्य अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत. अद्यापही 28 टक्के काम बाकी असून, मार्च अखेर ते पूर्ण केले जाईल.
                                                         – धनंजय देशपांडे,
                                   कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

Back to top button