बाणेर हॉस्पिटलची निविदा रद्द? मार्किंग पद्धतीवर देणार हॉस्पिटल | पुढारी

बाणेर हॉस्पिटलची निविदा रद्द? मार्किंग पद्धतीवर देणार हॉस्पिटल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बाणेर येथे कोविड काळात उभारलेले हॉस्पिटल खासगी संस्थेला चालविण्यासाठी काढलेली निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एका मंत्र्याशी संबंधित असलेल्या संस्थेला हे हॉस्पिटल चालविण्यास देण्यासाठी या प्रक्रियेत अडथळे आणले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. महापालिकेने कोविड काळात आर 7 अंतर्गत बाणेरमध्ये ताब्यात आलेल्या बांधीव मिळकतीत 200 बेडचे रुग्णालय सुरू केले होते. कोरोनानंतर मनुष्यबळाअभावी ते दीड वर्षापासून बंद आहे.

महापालिकेने मनुष्यबळ नसल्याचे कारण देत ते बंद ठेवले आहे. महापालिकेने हे हॉस्पिटल चालविण्यासाठी निविदा काढली. त्यात सहा संस्थांनी निविदा भरल्या. 2 अपात्र झाल्या आणि 4 पात्र झाल्या. या संस्थांमध्ये एक संस्था मुंबईची, दोन पुण्यातील तर एक पिंपरी-चिंचवडची होती. हे रुग्णालय चालविण्यास मिळावे, यासाठी राज्यातील एका मंत्र्याशी संबंधित संस्था प्रयत्नशील होती.

मात्र, प्रशासनाने ’अ’ पाकीट उघडले असता या नेत्याच्या संस्थेला काम मिळणार नसल्याचे समोर आले, तर या संस्थेला काम दिल्यास इतर संस्थांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे महापालिकेने या निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणेतेही कारण न देता निविदा रद्द केल्या आहेत. तसेच, नव्याने या निविदा काढताना मार्किंग पध्दतीचा अवलंब करून या नेत्याच्या संस्थेला काम देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button