पुणे : दहावी-बारावीसाठी प्रश्नपेढी उपलब्ध | पुढारी

पुणे : दहावी-बारावीसाठी प्रश्नपेढी उपलब्ध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) विषयनिहाय नमुना प्रश्नसंच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु, यंदा मात्र गेल्या वर्षीचेच प्रश्नसंच संकेतस्थळावर दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’ने 18 जानेवारीला ‘विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचा विसर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे जाग आलेल्या विद्या प्राधिकरणाने आता 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपेढी
उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे 25 टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज येण्यासाठी विद्या प्राधिकरणाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

मात्र, जानेवारीच्या मध्यापर्यंत विद्या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी दिसत होती. त्यामुळे यंदा प्रश्नपेढी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर निर्माण झाला होता. परंतु विद्या प्राधिकरणाकडून अखेर शंभर टक्के अभ्यास क्रमावरील विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नपेढ्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा सराव करता येणार आहे. प्रश्नपेढी https://www.maa.ac.in  या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या विषयांच्या आहेत प्रश्नपेढी उपलब्ध….
संकेतस्थळावर बारावीच्या युवक भारती, इंग्रजी, इतिहास, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र तर दहावीच्या गणित भाग एक आणि दोन (मराठी, इंग्रजी) विज्ञान भाग एक आणि दोन, इतिहास आणि राज्यशास्त्र (मराठी आणि इंग्रजी) कुमारभारती आदी विषयांचे प्रश्नसंच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क समुपदेशन सेवा
पुणे : राज्य मंडळातर्फे होणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत नि:शुल्क समुपदेशन मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची, तर 2 ते 25 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक तणावाखाली असतात.

अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाइन समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. 7387400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 8999923229, 9321315928, 7387647902, 8767753069 या क्रमांकांद्वारे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थ्यांचे निःशुल्क समुपदेशन करण्यात येईल. परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि प्रश्नपत्रिकेबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

Back to top button