पुणे : ‘सीईटी’साठी नोंदणीला मुहूर्त मिळेना | पुढारी

पुणे : ‘सीईटी’साठी नोंदणीला मुहूर्त मिळेना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी होणार्‍या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. मात्र, या परीक्षांची नोंदणी अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे या परीक्षांसाठी नोंदणी कधी सुरू होईल, अशी विचारणा होत आहे. या परीक्षा वेळेत झाल्या नाही, तर शैक्षणिक वर्ष सलग तिसर्‍या वर्षी उशिराने सुरू होण्याची चिन्ह आहेत. सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बीएड अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते.

विद्यार्थी आणि पालकांना या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आणि नोंदणीची प्रक्रिया सुरू होणे गरजेचे असते. त्यानुसार सेलने साधारण दीड महिन्यापूर्वी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. मात्र, परीक्षांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू झाली नाही. कोरोनापूर्व कालावधीत एमबीए, एमसीए अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी मार्च महिन्यात झाल्या होत्या. त्यानुसार यंदाही संभाव्य वेळापत्रकात एमबीए सीईटी 18 आणि 19 मार्च, तर एमसीए सीईटी 25 आणि 26 मार्च अशा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, अजूनही अंतिम नियोजन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन, प्रत्यक्ष परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थी-पालक संभ—मात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Back to top button