पुणे: शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती पुन्हा आक्रमक, टोलनाका स्थलांतर होत नाही तोपर्यंत सक्तीची टोलवसुली थांबवा | पुढारी

पुणे: शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती पुन्हा आक्रमक, टोलनाका स्थलांतर होत नाही तोपर्यंत सक्तीची टोलवसुली थांबवा

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे- सातारा महामार्गावर चुकीच्या अंतरावर खेडशिवापूर टोलनाका उभारून बेकायदेशीर आर्थिक लुट केली जात आहे. यासाठी स्थानिक खासदार व आमदार यांनी सूचित केलेल्या जागेवर स्थलांतर करणे गरजेचे असताना देखील टोलवसुली केली जात आहे. जोपर्यंत टोलनाक्याचे स्थलांतर होत नाही तोपर्यंत सक्तीची टोलवसुली थांबवावी, अन्यथा सर्वपक्षीय तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने टोल प्रशासनाला दिला आहे.

खेडशिवापूर येथील टोलनाका ( ता. हवेली ) हटवण्यासाठी सर्वपक्षीय स्थापित शिवापूर टोल हटाव कृती समिती पुन्हा आक्रमक झाली असून नसरापूर (ता. भोर) येथे समितीची शनिवारी ( दि. ११ ) बैठक झाली. यावेळी समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, जीवन कोंडे, माजी सभापती लहुनाना शेलार, डॉ. संजय जगताप, माजी उपसभापती रोहन बाठे, माऊली पांगारे, माऊली शिंदे, अरविंद सोंडकर, दादा आंबवले, विलास बोरगे, अशोक वाडकर, शिवराज शेंडकर, सचिन बदक, आदित्य बोरगे, राहूल पवार, राजेंद्र कदम, इरफान मुलाणी आदी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

ज्ञानेश्वर दारवटकर यांनी यावेळी सांगितले की, मे २०२२ मध्ये कात्रजमध्ये झालेल्या आंदोलनावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलनाका स्थलांतरसाठी लोकप्रतिनिधींनी जागा सुचवावी सांगितले होते. त्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, भीमराव तापकीर यांनी टोलनाका स्थलांतरीत साठी पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार केंद्राकडे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाठवला होता. त्याबाबत कार्यवाहीला केराची टोपली देऊन सक्तीची टोलवसुली केली जात आहे. टोलनाका हटवणे हीच स्थानिक आणि समितीची प्रमुख मागणी आहे. यासाठी सोमवारी टोल प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून एक महिन्याच्या मुदतीत बदल न झाल्यास सर्व पक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात १० ते १५ हजार नागरिक येण्याची शक्यता दारवटकर यांनी व्यक्त केली.

Back to top button