पाणी मागणी अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत; विवेक कोल्हे यांची मागणी

पाणी मागणी अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत; विवेक कोल्हे यांची मागणी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पाटबंधारे खात्याने नमुना नंबर 7 पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकर्‍यांना नुकतेच आवाहन केले आहे; मात्र गोदावरी उजवा व डाव्या कालव्याच्या कार्यालयात संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी भेटत नसल्याने शेतकर्‍यांची ससेहोलपट होत आहे. ऑनलाईन जमान्यात शेतकर्‍यांचे पाणी मागणी अर्जही ऑनलाईन स्वीकारण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. कोल्हे यांनी म्हटले आहे, की गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांचे आयुर्मान 119 वर्षांचे झाले आहे. त्याच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. ब्रिटीशकालीन कामे खिळखिळी झाल्याने शेतकर्‍यांना प्रत्येक आवर्तन काळात कालवा फुटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

मागील वर्षी पर्जन्यमान जेमतेम झाले, बारमाही गोदावरी कालव्यांच्या भरवशावरच या भागातील शेतकरी पीकपाणी परिस्थितीचे नियोजन करत असतो, विहिरींच्या अल्प पाण्यावर उन्हाळ पिकांचे नियोजन सध्या सुरू आहे, मात्र दोन आवर्तनांत जास्तीचा कालावधी पडल्याने शेतकर्‍यांचे पिकाचे नुकसान होत आहे, ऐन मोसमात त्याच्या पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे उत्पादनांत घट होत आहे.
सात नंबरवर पाणी मागणी अर्ज मागविण्यात आले; पण संबंधित सिंचन शाखेत प्रशासकीय यंत्रणा भेटत नाही. परिणामी शेतकर्‍यांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहे. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, बहुतांष जलसंपदा विभागाचे कामकाज संगणकीकरण झाले आहे.

तेव्हा शेतकर्‍यांचे पाणी मागणी अर्जही ऑनलाईन स्वीकारून त्याच्या शेतीला होणारा पाण्याचा पुरवठा त्याचे वेळापत्रक, कालवा आर्वतनाच्या तारखा, त्याच्याकडील सिंचनाची बाकी, फळबागा व अन्य पिकाबाबतची संपूर्ण माहिती शेतकर्‍यांना त्याच्या भ्रमणध्वनीवर पुरवून जलसंपदा विभागाने व नाशिक पाटबंधारे खात्याने त्यात गतिमानता आणावी, जेणेकरून शेतकर्‍यांनाही पाटपाणी पीकपद्धतीबाबत नियोजन करणे सोईचे होईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news