बेल्हे गावच्या रस्त्याचा श्वास कोंडला | पुढारी

बेल्हे गावच्या रस्त्याचा श्वास कोंडला

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वेगाने विकसित होणार्‍या बेल्हे गावात वाहनांची संख्या वाढली असून, या वाढलेल्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी होताना दिसते. बसस्थानक भागातही हीच समस्या भेडसावत असून, त्यामध्ये या वाहनांच्या पार्किंगने रस्त्याचा श्वास कोंडल्याचे चित्र आहे. बेल्हे गावातील वस्तीत हळूहळू वाढ होत असून, नागरिकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही.

त्यामुळे काही ठिकाणी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर तसेच ग्रामपंचायतीच्या मोकळ्या भूखंडांवर वाहनांचे अतिक्रमण झालेले आहे. यामुळे त्या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागाच मिळत नाही. ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक सदस्य याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावात वाढलेल्या अतिक्रमणांकडे सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांनीच लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

तालुक्याच्या राजकारणाची उलथापालथ करण्याची क्षमता असलेल्या बेल्हे गावात वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली पाहायला मिळते. परिवहन खात्याच्या माहितीनुसार वर्षात लाखो दुचाकी व चारचाकी वाहने ग्राहकांनी खरेदी केल्याचे सांगितले. गावात वाढलेली लोकसंख्या व वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना रोजच चालकांना करावा लागतो.

परंतु, वाढलेल्या वाहनांमुळे गल्लीबोळातील रस्तेच पार्किंगमध्ये अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच मिळेल त्या जागेवर वाहने पार्क करण्याची पद्धतच सुरू झाली आहे. गावात काही घरांचे बांधकाम करताना दुचाकी अथवा चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी जागाच ठेवण्यात आली नसल्याने रस्त्यावरच अनेक जण वाहने उभी करतात. यामुळे अनेकदा रस्त्यात उभ्या राहणार्‍या वाहनांमुळे वाद होतात.

 

Back to top button