पुणे : पानशेत परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ | पुढारी

पुणे : पानशेत परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरणखोर्‍यात सध्या बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. परिसरातील आंबेगाव बुद्रुक येथील जोगोबावाड्याजवळ बबन रामभाऊ डोईफोडे यांच्या मालकीच्या गायीचा बिबट्याने नुकताच फडशा पाडला. बिबटे, तरस आदी हिंस्र वन्यप्राणी व शेतकर्‍यांचे पाळीव जनावरे जंगलात एकाच पाणवठ्यावर येत असल्याने या घटना घडत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. शेतकर्‍यांनी रानात मोकाट जनावरे सोडू नये, योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन पानशेत वन विभागाने केले आहे.

जंगलातील डोंगर, कडेकपारीतील टाके, झरे आदी ठिकाणच्या पाणवठ्यांवर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. या पाणवठ्यावरच शेतकर्‍यांनी रानात चरण्यासाठी सोडलेले पाळीव प्राणीही पाणी पिण्यासाठी येत आहेत. पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणार्‍या पाळीव जनावरांची बिबटे व इतर हिंस्र वन्यप्राणी शिकार करीत असल्याचे वन विभागाच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. बबन डोईफोडे यांच्या पत्नी सावित्री या जोगोबावस्तीजवळील रानात गायी, बैल चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाणी पिण्यासाठी एक गाय घनदाट झुडपातील झर्‍यावर गेली. त्या वेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून या गायीचा फडशा पाडला.

Back to top button