पुणे : कोंडीबाबत नव्याने अभ्यास; अतिवर्दळीच्या पंधरा मार्गांचे विशेष समिती करणार सर्वेक्षण | पुढारी

पुणे : कोंडीबाबत नव्याने अभ्यास; अतिवर्दळीच्या पंधरा मार्गांचे विशेष समिती करणार सर्वेक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वाहतुकीशी संबंधित सर्व यंत्रणांची एक समिती गठित केली आहे. त्या समितीकडून पहिल्या टप्प्यात अतिवाहतुकीच्या (कोंडी होणार्‍या) पंधरा मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या मार्गांवर कोंडी होण्यामागील नेमकी कोणती कारणे आहेत, ती सोडविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे.

शहराचा वाढता विस्तार, दिवसेंदिवस वाढत असलेली वाहने आणि अरुंद रस्ते, यामुळे रस्त्यावरील कोंडी वाढतच चालली असून, ही कोंडी फोडण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेसह महापालिका, मेट्रो, पीएमपीएमएल, विद्युत वितरण आदी प्रमुख संस्था एकत्रितपणे काम करणार आहेत.

मंगळवारी (दि. 31) पुणे पोलिस आयुक्तालय येथे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ, महामेट्रो, पीएमआरडीए, स्मार्ट सिटीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणि त्यावर कराव्या लागणार्‍या उपाययोजना यांची एकत्रित चर्चा करण्यात आली.

शहर परिसरातील वाहनसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तुलनेत उपलब्ध रस्त्यांची संख्या अपुरी पडत असून, ठिकठिकाणी कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिस, महापालिका, पीएमपीएल, मेट्रोसह इतर संस्थांच्या अधिकार्‍यांकडून एकत्रित काम केले जाणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख गर्दीचे 15 मार्ग निवडले जाणार असून, त्याचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर या मार्गावरील बसथांबे, सिग्नल, पदपथ आदींची माहिती काढली जाणार आहे.

नियोजनासाठी एकत्रित समिती करणार काम
शहरातील 15 मार्गांची निवड करून त्या रस्त्यांवरील समस्या आणि उपाय शोधण्यासाठी पोलिस, महापालिका, पीएमपीएमएल, मेट्रोसह इतर संस्थांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेली एकत्रित समिती तयार केली जाणार आहे. समितीमध्ये प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी असल्याने समन्वय साधून काम करणे सोपे जाणार आहे.

विशेष पोलिस अधिकार्‍यांची नेमणूक
वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ पाहता वाहतूक नियमन करताना त्यांना देखील काही मर्यादा येतात. त्यामुळे जे नागरिक स्वतः पुढाकार घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, पोलिस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांची देखील मदत घेण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज, कंपन्या यांच्याकडून वॉर्डनची मदत घेतली जाणार आहे, असेदेखील पोलिस आयुक्तांनी सांगितले.

Back to top button